वार्ताहर /उचगाव
मध्यवर्ती म. ए. समितीने पुकारलेल्या राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक कार्यक्रमाला बसुर्ते गावातून शेकडो युवक आणि महिला उपस्थित राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाला म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले उपस्थित होते. गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ही बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पुंडलिक मोरे होते. म. ए. समितीच्या प्रत्येक लढय़ामध्ये या गावातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होतात आणि समितीच्या पाठिशी एकनिष्ठ असतात आणि हेच ध्येय आज परिसरातील सर्व नागरिकांनी बाळगले असून, येत्या काळामध्ये म. ए समितीचाच आमदार होणार असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणारी ही एकमेव संघटना असल्याचे यावेळी समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी सांगितले. कार्यक्रमाला सुरेश मयेकर, आंबेवाडी ग्रा.पं. अध्यक्ष चेतन पाटील, एन. के कालकुंद्री, नितीन राजगोळकर, लक्ष्मण घुमटे, विजय सावंत, घळगू बेनके, बाळू घुमटे, शिवाजी घुमटे, मल्लाप्पा बेनके, लक्ष्मण घुमटे आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी आपापले विचार मांडले.









