किरण जाधव जत
जत तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाला दणका बसला आहे. अवघ्या दोन टक्के झालेल्या पेरण्याही वाया गेल्या, त्यातच खरीपासाठी खते व बियाणे दुकानदारांनी कृषी विभागाच्या नियोजनानुसार मागवलेली तब्बल शंभर कोटींची खते, बियाणे, औषधे पडून आहेत. यामुळे एकिकडे शेतकरी हतबल असतानाच, कृषी दुकानदारांनाही अस्मानी संकटाने दणका दिला आहे. महाबीजने काही बियाणे पाऊस झालेल्या भागासाठी उचलले तरी खासगी कंपन्यांची बियाणे, खते पडून आहेत, त्यामुळे अशा कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत.
तालुक्यात यंदा दुष्काळाचे भीषण संकट ओढावले आहे. पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. नैसर्गिक साठवण तलावांनीही मृतसंचय पातळी गाठण्यास सुरूवात केली आहे. दहा वर्षानंतर ही गंभीर स्थिती स्पष्ट दिसू लागली आहे. हवामान खाते रोज महाराष्ट्रात पाऊस होईल असे संकेत देत असले तरी जत तालुक्याकडे ढगांनी पाठ फिरवली आहे. येत्या 20 जुलैपर्यंत कांहीतरी होईल अशी अपेक्षा बळीराजासह कृषी दुकानदार बाळगून आहेत.
तालुक्यात खरीपाचे 78,938 हेक्टर क्षेत्र आहे. यात बाजरी, उडीद, तूर, मका ही पिके घेतली जातात. जतची बाजरी चवदार असल्याने आणि अलिकडे दरही बरा असल्याने या क्षेत्रात वाढ होत आहे. उडीदालाही चांगली मागणी असून, या पेऱ्याचा टक्का वाढला आहे. यंदा जत तालुक्याला खरीपाची मोठी अपेक्षा होती. पंजाबराव डख, राज्य शासनाचे हवामान खाते यांनी पाऊस कमी असला तरी तो अपेक्षीत वेळेत व दुष्काळी पटट्यातही होईल असे भाकीत केले होते. परंतु हे सारे अंदाज निसर्गाने सफशेल फेल जात आहेत.
सन 2003 नंतर पहिल्यांदा घडले
खरिपाच्या पेरणीसाठी खते, बियाणे, औषधांना मागणीच नाही, अशी स्थिती पहिल्यांदाच घडली आहे. सन 2003 साली पावसाने अशीच ओढ दिली होती. त्यावेळी दुबार पेरणीचे संकट ओढावले, पण पेरा वाया गेला. त्यानंतर 2018 सालीही शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले. आज तब्बल दहा वर्षानंतर असे संकट पुन्हा ओढावले आहे. यामुळे कृषी दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे. मुळात यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. कंपन्या बियाणे, खते परत घेत नाही. घेतलेच तर त्या बदल्यात दुसरा माल उचलावा लागतो. कांही खते, बियाणे यांची डेडलाईन कमी असते. उलाढाल थांबली, माल पडून राहिला पण बँकांचे हप्ते, व्याज थांबत नाही, अशा स्थितीत अडकल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
कशी आहे जतेची स्थिती
जत तालुक्यात कृषी क्षेत्राला मोठा वाव आहे. तालुक्यात 350 दुकाने आहेत. यातील 250 दुकाने चांगल्या प्रकारे चालतात. तर 60 दुकानांची वार्षीक उलाढाल कोट्यावधीच्या घरात आहे. 25 मोठ्या गावात मोठमोठी दुकाने व अधिकृत डिलर आहेत. खरीप, रब्बी, द्राक्ष, डाळींब हंगामात मोठी उलाढाल ही दुकाने करत असतात. पण यात एका हंगामाने जरी दणका दिला तरी दुकानदारांना पुन्हा मुळ मुददलापर्यंतही पोहचता येत नसल्याचे म्हणणे आहे. यंदा शासनाच्या व दुकानदारांच्या समन्वय समितीच्या अहवालानुसार जतेत खरीपासाठी बाजरीचे बियाणे 40 टन, तूर 40 टन, मूग आठ टन, उडीद 50 टन, भूईमूग 30 टन मका 1793 क्विंटल, सूर्यफूल पाच टन अशी आवक केली होती. पण पाऊसच नसल्याने ही बियाणे, आवश्यक औषधे, खते दुकानात व गोडावूनमध्ये जशीच्या तशी पडून असल्याचे चित्र आहे.
दुकानदारांचे मोठे नुकसान
जत येथील प्रसिध्द कृषी दुकानदार अर्जुन सवदे म्हणाले, 2003 साली असा फटका बसला होता. त्यानंतर आजवर किमान नुकसान तरी झाले नाही. पण याखेपेस मोठी गुंतवणूक अडकून आहे. महाबीज कंपनीने पाऊस झालेल्या भागात येथील थोडेफार बियाणे उचलले आहे. पण खासगी कंपन्यांची बियाणे, खते पडून आहेत. छोट्या दुकानदारांना तर यातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. निसर्गापुढे कोण काय करणार अशी आमचीही स्थिती आहे. पण शेतकऱ्यांना तरी सरकारने आधार दिला पाहिजे.
सरकारचं जमलं असेल तर दुष्काळाकडे बघावे :
पंचायत समितीचे माजी गटनेते रवींद्र सावंत म्हणाले, जतची स्थिती गंभीर आहे. शेतकरी, व्यापारी मोडकळीस आला आहे. शाश्वत पाणी योजना नाही. म्हैसाळचे आवर्तन सुरू नाही. चारा टंचाई निर्माण झाली. असे असताना सरकार मात्र रोज सत्तेची गणितं जमवत आहे, त्यांचं जमवून झालं असेल तर दुष्काळग्रस्त भागाकडे लक्ष द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही.








