वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची ग्वाही ; 23 कोटी खर्चून आसगाव, हणजूण, बादे, म्हापसा दरम्यान भूमिगत वीजवाहिनी कामाचा शुभारंभ
म्हापसा : राज्यात पुढील 2 वर्षांत आणि 2027 वर्ष अखेरपर्यंत खासकरून एसटी लाईन, वन विभाग, शेतकी विभाग, किनारी भाग व शहरी भागातील संपूर्ण वीजवाहिन्या 100 टक्के भूमिगत करण्यात येतील, अशी घोषणा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आसगाव बार्देश येथे केली. आसगाव, हणजूण, बादें, म्हापसा दरम्यान भूमिगत वीजवाहिन्या कामाचा शुभारंभ मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी सुमारे 23 कोटी रु. खर्च होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो कार्यकारी अभियंता सुभाष पार्सेकर, आसागव सरपंच हनुमंत नाईक, उपसरपंच सोनिया श्रीसागर नाईक, हणजूण सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर, उपसरपंच अॅग्नीस कार्व्हालो, कंत्राटदार योगिराज, पंच सुदेश पार्सेकर, सुरेंद्र गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या कारकिर्दीत विविध योजना मार्गी!
अस्नोडा ते म्हापसा दरम्यानची जलवाहिनी 2012 मध्ये आपल्या कारकिर्दीत पूर्ण झाल्याचे यावेळी मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. पत्रादेवी ते काणकोण हमरस्त्याची योजना आपलीच असल्याचे ते म्हणाले. अटल सेतू, जुवारी पूल, पर्वरी बाझार रस्ता, इतर हमरस्ते, फ्लायओव्हर आदी 650 कोटीचे प्रकल्प निविदा काढून आपण तयार केले व ते स्व. मनोहर पर्रीकरांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास आले वीज खाते संपूर्ण राज्यात उत्कृष्ट सेवा बजावत असल्याचेही ते म्हणाले.
साळगाव उपकेंद्रासाठी लवकरच निविदा!
साळगाव उपकेंद्रासाठी 250 कोटीची निविदा लवकरच काढण्यात येईल. साळगाव उपकेंद्रामुळे साळगाव, शिवोली, कळंगूट, म्हापसा येथील परिसरात वीज खात्यात सुधारणा होण्यास मदत होईल. वेर्णा औद्योगिक वसाहतीसाठी 350 कोटीची नवीन उपकेंद्राची निविदा यापूर्वीच काढलेली आहे. थिवी येथे 40 कोटी खर्चून 3 एमव्हीए ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. मांद्रे येथे पुढील येत्या 2 महिन्यांत उपकेंद्राचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
बाराशे कोटींची कामे पूर्णत्वास!
गेल्या वर्षभरात 200 कोटीची कामे केली. आजपर्यंत आपल्या कार्यकाळात बाराशे कोटीची काम केली आहे, अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली. शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो सदैव कार्यरत असून विकासासाठी धडपड सुरू असते, असे ते म्हणाले.
भूमिगत वीजवाहिनीचे काम रोखू नका : आमदार लोबो
जनतेला हव्या असलेल्या पाणी, वीज, रस्ते या मूलभूत गोष्टी देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असते, असे आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले. त्यात रोजगार देण्यासाठी सरकार सदैव प्रयत्नशील आहे, आता सरकारने बेरोजगारांसाठी अॅप्रॅन्टिसशिप सुरू केले आहे. सर्वांनी पाचवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या साईटवर जाऊन आपले नाव नोंद करावे, असे आवाहन आमदार डिलायला लोबो यांनी केले. सरकारी नोकरीसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. म्हापसा आसगाव दरम्यान नव्याने भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहे. याला विरोध करू करू नये. यामुळे वीजपुरवठा खंडित समस्या बंद होणार आहे. 30 किलोमीटरच्या या कामासाठी 23 कोटी ऊपयाची निविदा काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यकारी अभियंता सुभाष पार्सेकर यांनी स्वागत केले व याबाबत माहिती दिली. आसगाव सरपंच हनुमंत नाईक यांनी सरकार व आमदर सौ. लोबो यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन एई रिचा शेट्यो केले. जेई ममता हळर्णकर यांनी आभार मानले. तर अभियंता मनोज कट्टीअरी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले.









