कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेला शंभर ई-बसेस मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. गुरुवारी ई-बसेसच्या मंजुरीचे पत्र मिळाले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये या बसेस कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षात कोल्हापूरातील रस्त्यांवर शंभर ई-बसेस धावणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खासदार महाडिक म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आहे. दळणवळणामध्येही देशातील प्रमुख शहरांमध्ये पीएम ई-बस योजनेतंर्गत 5 हजार ई-बसेस पुरविण्याचे उद्दीष्ट मोदी सरकारचे आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार या ई-बसेस देण्याचे नियोजन आहे. यातंर्गत कोल्हापुरला ई-बसेस मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पेंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वर्षभर पाठपुरावा केला. पहिला 50 ई-बसेसचा प्रस्ताव दिला होता. मात्र शहराचा विस्तार पाहता या बसेस कमी पडणार असल्याने सुधारित 100 ई-बसेसचा प्रस्ताव पाठविला.
30 ऑक्टोबरला या प्रस्तावाबाबत प्राथमिक बैठक झाली. यानतंर दोन नोव्हेंबरला अंतिम बैठक झाली. बैठकीमध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्याकडे या बसेससाठी पार्कींगची व्यवस्था, चार्जिंग स्टेशन, देखभालीसाठी मेकॅनिकल अशा यंत्रणांबाबतची विचारणा करण्यात आली. याबाबत जाधव यांनी सकारात्मक माहिती दिली. यानंतर गुरुवार 3 नोव्हेंबर रोजी 100 ई-बसेसच्या मंजुरीचे पत्र केंद्र सरकारकडून मिळाले असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर अध्यक्ष विजय जाधव, माजी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदी उपस्थित होते.
ई-बसेससाठी 40 कोटी
कोल्हापुरात येणाऱ्या एका ई-बसची किंमत 40 लाख रुपये आहे. त्यानुसार शंभर बसेसची किंमत 40 कोटी रुपये होते. बससाठीचा हा शंभर टक्के निधी केंद्र सरकारने दिला असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली.
बसमध्ये डिजिटल प्रणाली
या बसमध्ये डिजिटल प्रणाली असणार आहे. बसमध्ये वाहक नसतील. युपीआयद्वारे प्रवाशांना तिकीट खरेदी करावे लागणार आहे. तसेच युपीआय पेमेंट प्रणाली नसलेल्या प्रवाशांसाठी टॉपअप कार्डची व्यवस्था केली जाणार आहे. बसच्या चालकांकडेच हे कार्ड मिळणार आहे. प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार कार्डमध्ये पैसे भरता येणार असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली.
सांगली, मिरजपर्यंत बस धावणार
ई-बस केवळ शहराच्या हद्दीत न धावता त्या शहराबाहेर ही धावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरातून सांगली-मिरजलाही ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या ई-बस सांगली, मिरजपर्यंत धावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
रस्त्यांसाठी आणखी 90 कोटी मिळणार
कोल्हापूर शहरातंर्गत रस्त्यांसाठी सध्या 100 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रस्त्यांसाठी आणखी 90 कोटी रुपये मिळण्याचा प्रस्ताव दिला आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्तावाला मंजूरी मिळेल. त्यामुळे शहरातील रस्त्यांसाठी आणखी 90 कोटींची निधी मिळणार आहे. एकूण 190 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रस्ते लवकरच टकाटक होतील असेही खासदार महाडिक यांनी सांगितले.