वृत्तसंस्था / गुवाहाटी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठांच्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत वैयक्तिक गटात भारताच्या लालथाझुआला हमर आणि के. व्हेन्नला यांनी एकेरीत विजयी सलामी दिली.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कनिष्ठांच्या सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच कांस्यपदक मिळविले होते. आता वैयक्तिक गटातील सामन्यांना प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये भारताच्या सिडेड खेळाडूंना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. पण अन्य सामन्यात भारताच्या हमरने युगांडाच्या डेनिस मुकासाचा 15-4, 15-4 अशा गेम्समध्ये केवळ 14 मिनिटांत पराभव करत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे मुलांच्या एकेरीतील अन्य एका सामन्यात भारताच्या जी. दत्तुने हंगेरीच्या मिलान मिस्टेरएजीचा 5-15, 15-7, 15-7 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्र्रवेश मिळविला आहे.
मुलींच्या एकेरीतील पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या के. व्हेन्नलाने आयर्लंडच्या सायफ्रा फ्लीनचा 15-1, 15-6 असा फडशा पाडत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. अन्य सामन्यात चीनच्या लियु या ने जपानच्या नागाफुचीवर 15-10, 15-13, चीनच्या गाओ बो याने ब्राझीलच्या ब्रुनो अलोन्सोचा 15-9, 15-7, लंकेच्या वेरागोडाने मलेशियाच्या बून लीमचा 4-15, 15-8, 17-15 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. आता या स्पर्धेत भारताच्या सिडेड खेळाडूंच्या मोहिमेला मंगळवारपासून प्रारंभ होईल. तन्वी शर्मा, उन्नती हुडा आणि रक्षिता श्री यांनी या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे.









