अध्याय सविसावा
भगवंत उद्धवाला साधू कसा ओळखावा हे समजाऊन सांगत आहेत. त्यासाठी ते त्याच्या गुणांचं वर्णन करत आहेत. भगवंत म्हणाले, साधूचे किंवा संतांचे आठ गुण मी तुला सांगतो. लाभ किंवा हानी साधूंच्या चित्ताला बाधा करू शकत नाही. त्यांचे चित्त नेहमी भगवंताकडेच लागलेले असते म्हणून त्यांना कोणतीच अपेक्षा नसते. उद्धवा! साधूजवळ असलेला निरपेक्षपणाचा ठेवा, हा साधूचा पहिला गुण होय. निरक्षेप होण्याकरिता जागेपणी, स्वप्नात व सुषुप्तीत चित्स्वरूपी चित्त जडून राहणे ह्याचेच नाव ‘मच्चत्ति’ होय. हा संतांचा दुसरा गुण आहे. सर्वाभूती ब्रह्मभाव बाळगतो. तो ब्रह्मभावनेनेच सर्व प्राणिमात्रांवर विश्वास ठेवतो आणि त्याबद्दल त्याच्या चित्तात कधी अन्य विचार येत नाहीत. हाच ‘प्रशांतता’ नामक तिसरा गुण होय. तो सर्वांशी सारखेपणाने वागतो. जग पाहू गेले असता सर्वत्र वैषम्यच भरलेले, पण त्या वैषम्यातच जो ‘सम ब्रह्म’ पाहतो, तोच खरा ‘समदर्शी’ होय. हाच निरुपम चौथा गुण समजावा. ही समदृष्टि हाती येण्याकरिता भक्तिभावाने भगवंताचे भजन करत रहावे. म्हणजे सर्वत्र ईश्वरी अस्तित्व जाणवत राहते आणि त्याप्रमाणात इतरांच्या व शेवटी स्वतःच्याही अस्तित्वाचा विसर पडतो. देही असून विदेही अशी ही अवस्था असते. यासाठी सर्वत्र ईश्वर पाहण्याबरोबरच, अहंता व ममता निखालस सोडून दिली पाहिजे. देहाचा अभिमान वाटू लागला म्हणजे ती अहंता ‘मीपणा’ वाढविते आणि त्या मीपणाने देहाशी संबंधीत गोष्टींची ममता वाढते. त्यामुळे त्या गोष्टीत मन गुंतून पडते. त्या गोष्टी आपल्याजवळ असाव्यात असे वाटू लागते. त्या मिळवण्यासाठी एकच धडपड सुरु होते. त्यासाठी भलेबुरे मार्ग चोखाळले जातात त्यातून पाप पुण्याची जोडणी होते आणि ती उपभोगण्यासाठी पुनर्जन्माची जोडणी होते. बरे ती गोष्ट मिळाली तरी काही काळाने ती नष्ट तरी होते किंवा उपभोगुन संपते. मग पुन्हा त्या गोष्टीच्या नसण्याची हुरहूर लागून राहते. अपेक्षित गोष्ट मिळाली नाही तर वाईट वाटते. एकूण ज्याच्यात जीव गुंतवलेला आहे ती गोष्ट मिळाली तरी दुःख, नाही मिळाली तरी दुःख अशी अवस्था असते. म्हणून कशातही जीव न गुंतवण्यातच भले आहे. त्यामुळे मी ही गोष्ट मिळवली असा अहंकार होण्यापासून मनुष्य आपोआपच दूर राहतो. म्हणून उद्धवा, ही जी अहंममता असते ती महादुःखाच्या भोवऱयात पाडते. हे लक्षात घेऊन निजदुःख निवारण्यासाठी भक्तिभावाने गुरुना शरण गेले पाहिजे. शरणागती पत्करलेल्या शिष्यावर गुरूची पूर्ण कृपा होते. ते देहातील हवेपणा उघड करून दाखवतात, त्या हवेपणाचा म्हणजे देहबुद्धीचा त्याग करावा. देहबुद्धीचा त्याग केला की, मी म्हणजे हा देह, आणि समोर दिसणारा संसार खरं आहे असे वाटणे हे दोन्ही नष्ट होते. असे झाले की, सर्व विश्व मीच व्यापले आहे हे लक्षात येते. लहान थोर जे जे दृष्टीला दिसते, ते ते सारे सृष्टीमध्ये माझेच स्वरूप आहे, माझ्या मीपणाची व्याप्ती एवढी मोठी आहे की, ती साऱया त्रैलोक्मयाला घोटीत सुटते. अशा शुद्ध मीपणाने आपण परिपूर्ण असता तेथे देहाला मी म्हणावयाला म्हणणारे कोण आहे? मीतूपण सारेच आटोपते. याचंच नाव ‘निरभिमान’. असा माझ्या मीपणाचा विचार केला असता माझेपणा म्हणजे ‘ममता’ सारी नाहीशीच होते. अमुक एक गोष्ट माझी आहे असे म्हणावे तर ती कोठे आहे हे मनुष्य दाखवू शकत नाही कारण सर्व विश्व मीच व्यापलंय म्हंटल्यावर त्या गोष्टीला अस्तित्वच असत नाही. मग ज्या गोष्टीला अस्तित्वच नाही त्या गोष्टीबद्दल ममता किंवा आसक्ती वाटणारच नाही. त्यामुळे मनाची त्या गोष्टीत होणारी गुंतवणूक आपोआपच नाहीशी होते. तरीही म्हणशील की, वस्तू तर समोर दिसते आहे मग तिला अस्तित्व नाही असे कसे म्हणता येईल? तर ऐक, जी वस्तू समोर दिसतीये ना ती नाशवंत असल्याने तिच्या भासणाऱया अस्तित्वाला मिथ्या असं म्हणतात. हा सर्व मायेचा खेळ आहे. तेव्हा त्यात न गुंतलेलेच बरे. हे समजले की, मीपणाने ‘मी आणि माझे’, तसेच ‘तूंपणाने तुझे’ म्हणणेच उरत नाही. असे परब्रह्माशी ऐक्मय झाल्यामुळे सहजच मन ‘निर्मम’ होते. म्हणजे मझे असे काहीच नाही अशी खात्री पटते.
क्रमशः








