डॉ. निलांबरी जोशी : वसंत व्याख्यानमालेत गुंफले चौथे पुष्प :‘एआयचे सामाजिक परिणाम’ विषयावर व्यक्त केले विचार
बेळगाव : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर बोलणे म्हणजे फॅशन झाली आहे. इंटेलिजन्सवर टोकाचे विचार समजून घेण्यासाठी पुस्तक लिहिले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे माणसापेक्षा अधिक काम करू शकतात. मात्र, माणसाची जडणघडण वेगळी आहे. माणसाच्या जीवनात सामाजिक, राजकीय जडणघडणही महत्त्वाची आहे. माणूस 34 हजार भावना ओळखू शकतो. शिवाय देहबोलीवरून बऱ्याच गोष्टी ग्रहणही करू शकतो, असे विचार पुणे येथील डॉ. निलांबरी जोशी यांनी काढले. वसंत व्याख्यानमालेंतर्गत हेरवाडकर स्कूलमध्ये आयोजित व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सामाजिक परिणाम’ या विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षा सुनीता देशपांडे, स्वरुपा इनामदार होत्या. सुनीता देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. निलांबरी जोशी पुढे म्हणाल्या, माणूस आपला मेंदू वापरून जे काम करतो, ते काम आधुनिक युगामध्ये यंत्रांनी करून माणसासारखे आऊटपूट निर्माण करणे कृत्रिम बुद्धिमत्तेलाही जमते.
आपण काय करू शकतो, आणि संगणक काय करू शकते, हे समजून घेणे आवश्यक बनले आहे. लहान मुलांना चित्राद्वारे शिक्षण देता येते. मात्र, इंटेलिजन्स शिकविताना चित्रे ओळखता येत नाहीत. ते सावकाश शिकते आणि डाटाही जास्त लागतो. कॉम्प्युटरला अशक्य असलेल्या गोष्टी माणसाकडून केल्या जातात. 1962 ते 90 च्या काळात संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत अभ्यास केला. त्यानंतर त्याचे नेटवर्क जगभर पसरले. मागील 30 वर्षांत तर त्याची झपाट्याने वाढ झाली. आणि 2006 पासून त्यामध्ये मोठे बदल झाले. भारतापेक्षा जगातील इतर देशात कॉम्प्युटरचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. डॉ. निलांबरी जोशी यांचा सुनीता देशपांडे व स्वरुपा इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बृहन्महाराष्ट्र मंडळ व आनंद मोरप्पण्णवर कुटुंबीयांतर्फे हा कार्यक्रम पुरस्कृत करण्यात आला होता. यावेळी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम विनय कुलकर्णी, द्वितीय अपर्णा वेलंगी, तृतीय मेधा भंडारी व उत्तेजनार्थ म्हणून सुचेता कुलकर्णी, मृदूला कुलकर्णी, शुभांगी फाटक, किशोर काकडे, डॉ. कीर्ती बिर्जे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. आसावरी संत यांनी काम पाहिले.









