आज पृथ्वीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मानवाचा संचार आहे. पृथ्वीवरच्या सर्व मोठ्या प्राण्यांमध्ये मानवाची लोकसंख्या सर्वात अधिक आहे. इतकी अधीक, की या वाढत्या लोकसंख्येमुळे निसर्गावर प्रचंड ताण पडून निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे. जलचक्र असंतुलित होण्यासही मानवाची वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे, असे आता मानले जाते. तथापि, आज पृथ्वीवर अधिराज्य गाजविणारी हीच मानवजात, 41 हजार वर्षांपूर्वीच लयाला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण एका सौंदर्यप्रसाधन सदृश वस्तूमुळे मानवजात वाचली, असे आता काही संशोधकांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध करण्यात आले आहे.
एक्केचाळीस हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक अशी नैसर्गिक घटना घडली होती, की मानवजात संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. त्यावेळी उत्तरध्रूव प्रदेशात नैसर्गिक परिवर्तन झाले होते. या परिवर्तनामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र अत्यंत कमजोर झाले होते. त्यावेळी पृथ्वीवर आजच्या प्रमाणे केवळ एकच मानवप्रजाती नव्हती. होमोसेयिन्स, निअँडरथल आणि अन्य तीन ते चार प्रकारच्या मानवप्रजाती एकाचवेळी पृथ्वीवर वावरत होत्या. त्यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात परिवर्तन घडले होते, त्याचप्रमाणे वायू आवरण विरळ झाल्याने सूर्यापासून अतिनील आणि इतर प्रकारचे घातक किरणही पृथ्वीवर पडू लागले होते. हे किरण मानवासाठी अत्यंत धोकादायक असतात. त्यांच्यामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो. कित्येक मानव या नैसर्गिक आपत्तीला बळी पडून पृथ्वी मानवरहित होण्याची वेळ आली होती. तथापि, त्यावेळी होमोसेपियन्स या मानवप्रजातीला एका नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनाचा शोध लागला होता. हे प्रसाधन वनस्पतींपासून केलेले आणि एका लेपाप्रमाणे होते. ते अंगावर लावून घेतल्यास सूर्याच्या घातक किरणांपासून माणूस वाचत असे. तसेच त्यावेळी काही बुद्धीमान मानवांनी कपडे किंवा वल्कलांचाही शोध लावला होता. ज्यांच्याकडे हे त्या काळातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान होते, ते मानव निसर्गाच्या या विनाशकारी आपत्तीतून वाचले. त्यांनीच नंतर पृथ्वीवर मानवांची संख्या वाढविली. त्यामुळे मानवजात त्या जीवावरच्या संकटातून वाचली.
हे संशोधन ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या विज्ञान विषयक नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे संशोधन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग आणि अंथ्रोपोलॉजी विभागाच्या संशोधकांनी केले आहे. त्या भयानक नैसर्गिक आपत्तीतून केवळ बुद्धीने प्रबळ असलेले होमोसेपियन्स वाचले होते. इतर सर्व मानव प्रजाती नष्ट झाल्या होत्या. आज त्यामुळेच केवळ होमासेपियन्सच उरले आहेत.









