इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला तीन आठवड्यांचा कालावधी होत आला आहे. हे युद्ध लवकर थांबणार नाही, हेसुद्धा स्पष्ट झाले आहे. हमास या क्रूर आणि निर्दयी दहशतवादी संघटनेने इस्रायलवर कोणतेही कारण नसताना केलेल्या अत्याचारी हल्ल्यामुळे या युद्धाचा प्रारंभ झाला असून इस्रायलने हमासला संपविण्याचा निर्धार आणि निश्चयही केला आहे. या युद्धामुळे साऱ्या जगाची दोन तटांमध्ये विभागणी झाल्याचे स्पष्ट दिसते. इस्रायलचे समर्थक आणि इस्रायलचे द्वेष्टे अशीच ही विभागणी आहे. समर्थक कोण आहेत आणि द्वेष्टे कोण आहेत, हे देखील स्पष्टपणे कळून येते. इस्रायल हा देश त्याच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशीच युद्धात लोटला गेला. तेव्हापासून तो सातत्याने युद्धमान स्थितीतच असतो. पण त्याच्या आणि अवतीभोवतीच्या अरब राष्ट्रांच्या आतापर्यंतच्या संघर्षांमुळे जगाची अशी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विभागणी आजवर झालेली नव्हती. या विभागणीतून अनेकांचे अंत:स्थ हेतू आणि ‘नियत’ स्पष्ट होत आहे. वरवर नि:पक्षपातीपणाचा आव आणणारे, स्वत:ला मानवाधिकारवादी समजणारे आणि अन्यायाविरोधात वारंवार चीड व्यक्त करणारे लोक आतून कसे आहेत, हे या निमित्ताने उघडपणे समोर आले, हा या युद्धाचा एक दृष्य परिणाम म्हणावयास हवा. इस्रायल आणि हमास यांच्यातील या सशस्त्र संघर्षामुळे मानवतावादाच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या असून नेमके कशाला मानवतावाद म्हणावे आणि मानवतावाद ही उदात्त संकल्पना नेमकी कोणाचा लाभ करुन देते हे प्रश्नही निर्माण झाले आहेत. जगातील कोणताही देश किंवा त्याचे प्रशासन हे वेळोवेळी करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय मानवतावादी करार किंवा कन्व्हेन्शन्स यांनी बांधलेले असते. स्वत:च्या अस्तित्वावर संकट ओढवले तरी त्या देशाने आपल्या मर्यादा सोडू नयेत, लक्ष्मणरेषा ओलांडू नये आणि आंतरराष्ट्रीय नियम आणि कर्तव्ये यांचे पालन काटेकोरपणे करावे, अशी अपेक्षा स्वत:ला मानवतावादी म्हणवून घेणारे लोक करत असतात. पण दहशतवादी संघटनांना कोणतेही नियम नसतात. कोणताही आंतरराष्ट्य्री करार, प्रथा, पायंडा, नियम किंवा कर्तव्ये त्यांना लागू होत नाहीत. त्यांनी काहीही करावे, कोठेही हल्ला करावा, महिलांची विटंबना करावी, लहान मुलांचे गळे चिरावेत, बाँबस्फोट घडवावेत, निरपराध लोकांच्या मनमुराद हत्या कराव्यात, बालकांसह कोणाचेही आणि कितींचेही अपहरण करावे, पुन्हा त्यांचाच मानवी ढाल म्हणून उपयोग करुन आपल्या अटी लादण्याचा प्रयत्न करावा, तसेच एवढे सगळे अत्याचार करुनही ‘हे आम्ही आमच्या न्याय्य अधिकारांसाठी करीत आहोत’ अशी शेखी मिरवावी आणि त्यांना कोणीही काही म्हणूसुद्धा नये. आज आपल्यावरील हल्ल्याचा प्रतिकार करणाऱ्या इस्रायलला काही लोक अत्यंत साळसूदपणे मानवतावादी जाब विचारीत आहेत. मात्र, हेच लोक हमासने मानवतेचे सर्व नियम धाब्यावर बसवून केलेल्या अनन्वित अत्याचारांचा साधा उल्लेखही करण्यास तयार नाहीत. या विसंगतीतून त्यांचा दांभिकपणा आणि प्रच्छन्न पक्षपातीपणा तर उघड होतोच, शिवाय मानवतावादाच्या नियमांचा लाभ अंतिमत: ते मोडणाऱ्यांनाच कसा होतो, हे स्पष्ट होते. इस्रायलने हमासचा बंदोबस्त करावयास हरकत नाही. पण हे करीत असताना एकही निरपराध नागरिक मारला जाऊ नये, त्याला साधी जखमसुद्धा होऊ नये. त्याच्या सुरक्षिततेची हमी देऊनच दहशतवादाविरोधात कारवाई करावी, असा उपदेश त्या देशाला करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण दहशतवादी संघटनांनी आपल्याजवळच्या लोकांनाही वेठीस धरलेले असते. त्यांचाही उपयोग मानवी ढाल म्हणून केला जातो. सशस्त्र संघर्षात लहान मुलांना पुढे केले जाते. कित्येकदा मानवताविरोधी गुन्हे आणि हिंसाचार करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा उपयोग त्यांच्याकडून हेतुपुरस्सर केला जातो. अल्पवयीन व्यक्तीने कोणताही गंभीर गुन्हा केला किंवा कितीही मोठा हिंसाचार केला तरी त्याला गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा केली जात नाही. उलट एक प्रकारे त्याचे संरक्षणच केले जाते. त्यामुळे दहशतवाद माजविणाऱ्या संघटना अशा नियमांचा उपयोग स्वत:च्या कारनाम्यांसाठी सर्रास करीत असतात. भारतात काश्मीरसारख्या भागांमध्ये असे प्रकार घडले आहेत. अशावेळी नेमस्तपणे आणि कायदेशीर मार्गाने प्रतिकार कसा केला जाऊ शकतो? युद्धात किंवा सशस्त्र संघर्षांमध्ये मुले आणि निरपराध महिलांना कोणताही त्रास दिला जाऊ नये, असा नियम आहे. पण जेव्हा त्यांचाच उपयोग दहशतवादी स्वत:च्या संरक्षणासाठी करतात आणि त्यांना आघाडीवर ठेवून स्वत: त्यांच्या आडून शस्त्रे चालवितात, त्यावेळी काय करायचे याचे काही नियम किंवा संकेत असावेत असे या दांभिक मानवताप्रेमींना वाटते काय? तुम्ही दहशतवाद्यांना मारा, पण निरपराध्यांना हात लावू नका, असा उपदेश करणे सोपे आहे. तथापि, दहशतवाद्यांनी स्वत:ला अशाच लोकांमध्ये लपविलेले असते. ते दहशतवाद्यांचे युद्धतंत्रच असते. अशा स्थितीत कायद्याच्या किंवा आंतरराष्ट्रीय करार-मदारांमधील तरतुदी वाचत समाजकंटकांचा बंदोबस्त करणे, कितीही निष्णात सेनेला किंवा सुरक्षा दलांना कसे शक्य होईल? याचा विचारही करावयास नको काय? तेव्हा मानवता नेमकी कोणासाठी, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे. ज्यांचा व्यवहारच मानवाप्रमाणे नसतो, त्यांना मानव कसे म्हणावे? आणि त्यांना निरपराध्यांना त्रास होऊ नये हे तत्व अगदी योग्य आहे. पण ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’ अशी म्हण आपल्याकडे आहे. इंग्रजीत याला ‘कोलॅटरल डॅमेज’ असे म्हणतात. याचा अर्थ असा की, मोठे संकट दूर करताना काहीवेळा नियम मोडणे क्रमप्राप्त बनते. स्वत:ला मानवतेचे कैवारी म्हणणाऱ्यांनी थोडा दुसऱ्या बाजूचाही विचार करावा. ज्या दहशतवादी संघटनांनी एखादा देश, समाज पूर्णत: नष्ट करण्याचा निर्धार केलाय अणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे, त्यांना प्रत्युत्तर देताना तो देश किंवा समाज गणिती पद्धतीने हिशेब घालून आणि नियमांचे चोख पालन करुन स्वत:चे संरक्षण करु शकणार नाही. शेवटी जसा वार तसा प्रतिवार हे व्यवहारी धोरण अवलंबावे लागते. स्वत:ला समाजधुरीण म्हणवणाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी.
Previous Articleसद्गुरूंची भक्ती म्हणजे त्यांची शारीरिक सेवा नव्हे
Next Article दहशत… वाघनखांची!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








