नवरात्रोत्सवाच्या तोंडावर घटप्रभेत महिलेची चपलांचा हार घालून धिंड
बेळगाव : सर्वत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा जागर सुरू आहे. ठीक दोन दिवस आधी एका महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून मध्यरात्री तिची धिंड काढल्याचा अमानुष प्रकार घटप्रभा येथे घडला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून धिंड काढल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खेदाची बाब म्हणजे धिंड काढणाऱ्यांत महिलांचाच सहभाग मोठा आहे. सर्व थरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. शुक्रवार दि. 13 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली आहे. हनिट्रॅप करून पैशांसाठी ब्लॅकमेल करीत असल्याचा ठपका ठेवत एका महिलेला घरातून बाहेर काढून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावात तिची धिंड काढण्यात आली आहे. यासंबंधी शनिवारी या 42 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून 23 हून अधिक जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घटप्रभाचे पोलीस निरीक्षक बसवराज कामनबैल व त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्जुन गंडवगोळसह 13 जणांना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. घटप्रभा पोलीस स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. भर चौकात उभी करून या महिलेला मारहाण करण्यात आली असून तिच्या खुनाचाही प्रयत्न झाला आहे. सदर महिलेला या कंपूने दोन दिवसांपूर्वी धिंड काढण्याची धमकी दिली होती. यासंबंधी तिने पोलिसांकडे आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याची तक्रारही केली होती. पोलिसांनी वेळीच याची दखल घेतली असती तर हा निंद्य प्रकार टाळता आला असता. घटप्रभा येथील अर्जुन गंडवगोळ व 20 ते 25 जणांनी शुक्रवारी रात्री त्या महिलेचे घर गाठले. ‘आमच्याविरुद्ध अर्ज का दिलीस?’ अशी विचारणा करीत तिला बाहेर बोलाविण्यात आले. ही महिला घरातून बाहेर आली. ‘आपल्याला शिवीगाळ का करीत आहात?’ असा प्रश्न तिने विचारला. ‘मारुतीवर घातलेली केस मागे घे, नाहीतर पाच लाख रुपये दे. तेही नको तर गाव सोडून जा’ असे सांगत महिलेला धमकावण्यात आले आहे.
जिल्हा पोलीसप्रमुखांना नाही सोयरसुतक…
नागरी समाजाने शरमेने मान खाली घालावी, अशी ही घटना आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांना मात्र या घटनेचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येते. त्यांनी आपला सरकारी मोबाईल क्रमांक ‘कॉल फॉरवर्ड’ करून ठेवला आहे. उलट अशा गंभीर स्वरुपाच्या घटनेवेळी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेतात. अनर्थ टाळण्यासाठी व तेथील तेढ कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. या प्रकरणात मात्र कसलेच प्रयत्न पोलीस दलाकडून झाल्याचे दिसून येत नाही. नवरात्रोत्सवाच्या तोंडावर सर्वत्र देवीचा जागर सुरू असतानाच हा खळबळजनक प्रकार घडला असून महिलेची धिंड निघाली त्यावेळी काही स्थानिक पोलीस तेथे उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी पोलीसप्रमुखांना जाग आली आहे. त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून 13 जणांना अटक केल्याची माहिती दिली आहे.









