वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मानवी तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) देशभर धाडसत्र चालविले आहे. आठ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील विविध स्थानी या धाडी घालण्यात आल्या आहेत. अद्यापही हे धाडसत्र सुरु असल्याची माहिती एनआयएने पत्रकारांना दिली आहे.
त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा आणि राजस्थान ही राज्ये आणि जम्मू-काश्मीर आणि पुदुच्चेरी हे पेंद्रशासित प्रदेश येथे या धाडी घालण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये एका रोहिंग्या मुस्लिमाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव झफर आलम असे आहे. मानवी तस्करी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच, आणखी एक आरोपी सध्या बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. मानवी तस्करीचा गुन्हा करणारे आठ महत्वाचे आरोपी असून त्यांना पकडण्यासाठी हे धाडसत्र चालविण्यात येत आहे.









