धर्मस्थळमधील मृतदेह पुरल्याच्या प्रकरणाला कलाटणी
बेंगळूर : धर्मस्थळ पोलीस स्थानक हद्दीत अनेक मृतदेह पुरल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. एसआयटीच्या पथकाला उत्खननाच्या तिसऱ्या दिवशी मानवी कवटीसह सांगाड्याचे काही अवशेष आढळून आले आहेत. आता सांगाड्याचे अवशेष कोणत्या व्यक्तीचे आहेत?, किती वर्षांपूर्वी त्याचे दफन करण्यात आले?, मृत्यूचे कारण कोणते? याचा तपास केला जाणार आहे. त्यामुळे तपासाविषयी कुतूहल वाढले आहे. तक्रारदार व्यक्तीने दाखविलेल्या सहाव्या ठिकाणी गुरुवारी 15 कामगार आणि हिटाची मशिनच्या साहाय्याने उत्खनन करण्यात आले. यावेळी मानवी सांगाड्याचे 12 अवशेष सापडले आहेत. ते ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांकडे सोपविण्यात आले असून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे.
सदर सांगाडे पुरुषाचे असल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच याविषयी स्पष्ट होणार आहे. धर्मस्थळनजीक नेत्रावती नदीच्या स्नानघाटाजवळ मंगळवारी एका ठिकाणी आणि बुधवारी चार ठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. परंतु, कोठेही मानवी मृतदेहाचे अवशेष सापडले नव्हते. तक्रारदाराने दाखविलेल्या सहाव्या ठिकाणी गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून भर पावसात उत्खननाचे काम हाती घेण्यात आले. यावेळी कामगारांनी 9 फुटापर्यंत खोदकाम केले. यावेळी मानवी कवटीचे दोन तुकडे, हात, पाय, व इतर अवयवांची हाडे सापडली. ती प्रकरणाशी संबंधित आहेत का, याचा तपास करण्यात येत आहे. सहाव्या ठिकाणी पूर्णपणे मानवी सांगाडा सापडला नसला तरी काही अवशेष सापडल्याने या प्रकरणाविषयी कुतुहलात भर पडली आहे.
हेल्पलाईन, ई-मेल जारी
दरम्यान, एसआयटीचे प्रमुख प्रणब मोहंती यांनी या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. शुक्रवारी सातव्या आणि आठव्या ठिकाणी उत्खनन करून मृतदेह, सांगाड्यांचा शोध घेतला जाणार आहे. तक्रारदाराने दाखविलेल्या सहाव्या ठिकाणी मानवी सांगाड्याचे काही अवशेष सापडल्यानंतर एसआयटीने व्हाट्सअॅप क्रमांक आणि हेल्पलाईन तसेच ई-मेल जारी केला आहे.
डीएनए चाचणीची शक्यता
गुरुवारी सापडलेले अवशेष प्लास्टिक कव्हरमध्ये पॅक करून फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत हे अवशेष मानवी असल्याची पुष्टी झाल्यानंतर डीएनए चचणीसह वैज्ञानिक विश्लेषण केले जाणार आहे. कारण सापडलेले अवशेष आणि अज्ञात व्यक्तीने मृतदेह पुरल्यासंबंधी दिलेल्या तक्रारीत साम्य आहे का, याचा तपास केला जाणार आहे. धर्मस्थळजवळील नेत्रावती नदीच्या स्नानघाटाजवळ 1998 पासून ते 2014 पर्यंत शेकडो महिला आणि मुलांचे मृतदेह पुरल्याची तक्रार एका स्वच्छता कर्मचाऱ्याने दिली होती. हे मृतदेह अत्याचार आणि खुनाशी संबंधित असल्याचे त्याने सांगितले होते. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यानुसार 4 जुलै रोजी धर्मस्थळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवून तक्रारदाराला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासासाठी दबाव आल्यानंतर सरकारने 19 जुलै रोजी एसआयटीकडे सोपविले होते.
एमबीबीएस विद्यार्थिनीचा मृतदेह शोधण्याची मागणी
दरम्यान, धर्मस्थळमध्ये बेपत्ता झालेल्या एमबीबीएस विद्यार्थिनी अनन्या भट हिच्या मृतदेहाचे सांगाडे शोधावेत, अशी तक्रार सुजाता भट यांच्या कायदा सल्लागारांनी दाखल केली आहे.
एसआयटीला आणखी ‘बळ’
एसआयटीच्या पथकात 20 जणांचा समावेश करण्यात आला होता. गुरुवारी आणखी 9 जणांनी नेमणूक करण्यात आली आहे. राज्य पोलीस महासंचालक एम. ए. सलीम यांनी हा आदेश दिला. उप्पीनंगडी पोलीस स्थानकाचे एएसआय लॉरेन्स, विट्ल पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल मनोज, पुंजालकट्टे स्थानकाचे कॉन्स्टेबल संदीप, उडुपी सीएसपी स्थानकाचे कॉन्स्टेबल लोकेश, होन्नावर स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल सतीश नायक, व इतर अधिकाऱ्यांचा एसआयटीच्या पथकात समावेश करण्यात आला आहे.
एटीएम, पॅनकार्डचे रहस्य उघड
मंगळवारी उत्खनाच्या पहिल्या दिवशी अडीच फूट खाली लाल रंगाचे कापड, पॅनकार्ड व एटीएम कार्ड आढळले होते. हे देखील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. एसआयटीच्या पथकाने एटीएम कार्ड असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता ती व्यक्ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे डेबिट कार्ड एका महिलेचे असून ती नेलमंगल येथील असल्याचे समजते.









