अध्याय पंचविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, ममता ही गुणानुरूप तीन प्रकारच्या स्वरूपांनी स्फुरत असते. ममतेमुळे मनाची गुंतवणूक होते. सत्वगुणामुळे मनुष्य असे समजतो की, माझ्या हृदयामध्ये जो भगवान् आहे, तोच सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये आहे. जे भक्त आहेत, संत, साधु, सज्जन आहेत, तेच माझे आप्त इष्ट आहेत. याची जिवाहून अधिक प्रेम सद्गुरुचरणांवर अधिक नि÷ा असते. राजस ममता बाळगणारा मनुष्य निवृत्तीमार्ग हा खोटा समजतो, लौकिकात मानसन्मानाची इच्छा धरतो, राजस गुणामुळे माणसाला समोर दिसणारा आणि निखालस खोटा असलेला संसार खरा वाटत असतो. त्याला बायकामुले व द्रव्यात त्याचा जीव गुंतलेला असतो. त्यामुळे त्यांचा त्याला मोठा लोभ असतो. ज्या दैवतांची भक्ती करताना नावलौकिक होईल, संपत्ती मिळेल, ती ती दैवते त्याला आवडतात. आता तमोगुणाचे स्वरूप ऐक.
तमोगुणामुळे मनुष्य आपल्या देहाचा अपमान करतो, पूर्वीच्या वाडवडिलांचा द्वेष करतो, स्वार्थाआड जो भाऊबंद येणे शक्मय आहे. त्याच्याबरोबर वैर धरतो. असे शत्रु मी ठार मारीन म्हणून जारणमारणादि अभिचारकर्मामध्ये शिरतो. एकेक गुणामध्ये अनंत शक्ती आहेत. माणसाचा स्वभाव हे तिन्ही गुणांचे बेमालूम मिश्रण असते हे तिन्ही गुण जेथे मित्र होतात, त्याला ‘सन्नीपातवृत्ती’ असें नाव आहे. शरीरात जेव्हा कफ, वात आणि पित्त तिन्ही दोष एकत्र येतात, तेव्हा त्यांची युती हानिकारक ठरते. त्यामुळे शरीराचे आजार वाढत जातात. याला सन्नीपात असे म्हणतात. त्याप्रमाणेच संकल्पविकल्पात्मक मन, पंचविषय, पंचप्राण आणि दशेंद्रियांचा संपूर्ण व्यवहार यात तीन गुणांचा सन्नीपात होतो.
जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम हे पुरूषार्थ साध्य करण्यात तत्पर असतो, तेव्हा त्याला सत्त्वगुणापासून श्रद्धा, तमोगुणापासून धन आणि रजोगुणापासून प्रेम यांची प्राप्ती होते. येथेही सन्नीपातामुळे गुणांचे मिश्रण होते. हे मिश्रण आपला प्रभाव दाखवू लागले की, माणसाचा स्वभाव अत्यंत चंचल होतो. क्षणोक्षणी त्याच्या मनोवृत्ती बदलत जातात. त्याच्या ठिकाणी क्षणात क्रिया, क्षणात कर्म, क्षणात स्वधर्म, क्षणात काम, क्षणात द्रव्य मिळविण्याचा उद्योग, अशा भिन्नभिन्न वृत्तड उद्भवतात. हाच त्रिगुणांचा सन्नीपात होय. गुणांचे हे मिश्रण काय करिते, तर या तीन गुणांनी धर्म तीन प्रकारचा होतो, काम तीन प्रकारचा होऊन राहतो आणि अर्थ, स्वार्थ व निर्वाह हे सर्व तीन प्रकारचे होतात. कर्मात दोष नसतो. दोष हा कर्त्यांच्या बुद्धीमध्ये असतो. तो जी काही कल्पना करतो, तिचे फळ तो स्वतः भोगतो. सोने हे आपल्या सोनेपणाने सन्माननीय आहे. त्याचेच जर आपण एखादे कुत्रे बनवले, तर त्या वंदनीय सोन्याची विटंबना केल्याप्रमाणे होते. त्याप्रमाणेच स्वकर्म गुणबुद्धीने दूषित होते. भूमी ही मूळचीच शुद्ध आहे. तिच्यात जे पेरावे त्याचे पीक येते. त्याप्रमाणे स्वकर्म हे स्वतः मूळचे शुद्धच आहे, परंतु गुणांच्या वृत्तीप्रमाणे त्याचे फल भोगावे लागते. वाणी स्वभावतः सरळ आणि शुद्ध आहे. तिला रामनामाने ब्रह्मस्वरूप प्राप्त होते. परंतु तिने भलतीच बडबड केली असता ती व्यर्थ जाते आणि तिने निंदा केली तर त्यामुळे मागाहून महापाप भोगावे लागते. थोडक्मयात कोणतीही कृती करताना त्यामागील हेतू गुणांच्या प्रभावानुसार बदलत जातो आणि त्याचे परिणाम माणसाला भोगावे लागतात.
उदाहरणार्थ श्रद्धायुक्त बुद्धीने स्वधर्माचरण केले, तर ते स्वधर्माचरण मनुष्याला विरक्त करते पण त्यात त्रिगुणांचा सन्नीपात झाला तर तीच श्रद्धा छळ करू लागते. तोही प्रकार ऐक. स्वधर्मकर्मामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि त्यामुळे मनुष्य क्षणैक विरक्तीकडे वळतो. क्षणात त्याला भोगफळाची आशाही वाढत वाढत जाते किंवा तो क्षणैक ममतेच्या संधीत सापडतो. कामाचाही प्रकार तसाच आहे. क्षणैक निष्कामतेमध्ये अत्यंत प्रेम असते, क्षणात स्त्रीभोगाविषयी आसक्ती उत्पन्न होते किंवा क्षणात परस्त्रीच्या ठिकाणीच कामवासना उत्पन्न होते. याचप्रमाणे द्रव्याचीही गोष्ट आहे. मनुष्य क्षणात द्रव्याची आशा सोडून देतो, क्षणात द्रव्याविषयी त्याला अत्यंत आवड उत्पन्न होते किंवा क्षणामध्ये दुसऱयाचे द्रव्य लुबाडून घेतो.
क्रमशः








