अतुल मुळीक, वाटेगाव
Sangli News : सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचं मुलाने वडिलांना फोनवर सांगितलं.बस कंडक्टर असणाऱ्या या वडिलांनी तातडीने एका दुकानाजवळ बसला बेल दिली.आणि पटकन खाली उतरले,पेढ्याचे बॉक्स घेऊन आले.शिराळा आगाराची शिराळा-मुंबई ही बस मुंबईला निघाली होती.कंडक्टर असणाऱ्या वडिलांना ड्युटीवर असतानाच फोन आला.मुलाची सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचं त्यांना फोनवर समजलं. ही गोड बातमी ऐकून कंडक्टरचा आनंद गगनात मावेनासा झाला.ही आनंदाची बातमी त्यांनी आपल्यापुरती न ठेवता बेल मारुन बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना पेढे वाटले. आपल्या मुलाचा अभिमान बाळगणाऱ्या पित्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
बस कंडक्टर नंदकुमार ढेबे (रा.वाटेगाव, ता.वाळवा, जि.सांगली) यांना त्यांचा मुलगा शुभम याचा फोन आला.त्याची सीआरपीएफमध्ये निवड झाली असल्याचे त्याने वडिलांना सांगितलं.वडील आपल्या कर्तव्यावर होते. त्यांनी आपल्या सोबत असणाऱ्या प्रवाशांसोबतच आनंद व्यक्त करायचे ठरवले.आणि प्रवाशांना पेढेही वाटले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून प्रवाशांनीही शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आनंदात सहभागी झाले. हा व्हिडीओ पाहिल्यावर मुलाने घेतलेल्या कष्टाचे चीज झाले.वडिलांचे नाव मोठे केले,अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या बसमधून सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव प्रवास करत होत्या. हळव्या बापाला झालेला आनंद त्यांनी प्रवाशांसोबत व्यक्त केला. हा गोड क्षण जाधव यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. तसेच आपल्या वाळवा तालुक्यातील असणाऱ्या कंडक्टर नंदकुमार ढेबे यांचे बसमध्येच अभिनंदन केले.