भेटवस्तू, जादा व्याज दर, बिनव्याजी कर्ज, ऑनलाईनद्वारे नोकरीची संधी या भूलथापांना बळी पडू नका : सरकारकडून गांभीर्याने उपाययोजना
बेळगाव : बेळगाव, विजापूर, बागलकोट, हुबळी-धारवाडसह उत्तर कर्नाटकातील प्रमुख जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले आहेत. कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे तर फसवणूक झाल्यानंतर पोलीस स्थानकात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. संपूर्ण राज्यातील घटनांपेक्षाही बेंगळूरमधील फसवणुकीचे प्रकार अधिक आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यानेच आता सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने गांभीर्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या उपस्थितीत शनिवारी बेंगळूर येथे सीआयडी डीकोड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या? याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतानाच कर्नाटकातील प्रत्येक पोलिसाला सायबर गुन्हेगारी कशी चालते? ती रोखण्यासाठी काय करावे? याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सीआयडी व सायबर गुन्हेगारी तपास प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्यावतीने ‘हॅकेथॉन व सायबर लॉ आयडियाथॉन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासंबंधी विद्यार्थ्यांचाही सहभाग वाढविण्यात आला आहे. यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हॅकेथॉनमधील विजेत्या विद्यार्थ्यांना गृहमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले आहेत.
कर्नाटकातील 46 हजारहून अधिक अधिकारी व पोलिसांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस स्थानकांची संख्या, एकूण पोलिसांची संख्या व वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेता सायबर गुन्हेगारीविषयक माहिती असणाऱ्या पोलिसांची संख्या कमी आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आता राज्यातील सर्व अधिकारी व पोलिसांना प्रशिक्षण देण्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ओटीपी मिळवून बँक खात्यातील रक्कम हडप करणे, एपीके फाईल पाठवून मोबाईलमधील डेटा हॅक करण्याचे प्रकार बेंगळूर, बेळगाव, दावणगेरी, विजापूर, हुबळी-धारवाड परिसरात वाढले आहेत. राजधानी बेंगळूर येथील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दाखल होणाऱ्या एकूण प्रकरणांपैकी 30 टक्क्यांहून अधिक गुन्हे सायबर क्राईमविषयक आहेत. सायबर गुन्हेगारीचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. ते आणखी वाढण्याची शक्यता गृहित धरून राज्यातील बहुतेक पोलीस व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले आहे. गृहखाते, नागरी पोलीस, सीआयडीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी रोखण्यासह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात तर विजापूर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांचे बँक खाते गोठवून 2 कोटी 47 लाख 84 हजार 645 रुपये रक्कम संबंधितांना परत केली आहे. बेळगाव शहर व जिल्हा सीईएन विभागानेही आंतरराज्य सायबर गुन्हेगारांची धरपकड केली आहे.
वारंवार जागृतीची मोहीम
फसवणूक होऊ नये, यासाठी सायबर क्राईम विभागाकडून वारंवार जागृतीची मोहीम राबविली जाते. बेळगावात तर गेल्या महिनाभरापासून सायबर गुन्हेगारीविषयक जागृतीसाठी शाळा-कॉलेजमध्ये कार्यक्रम भरविण्यात येत आहेत. प्रमुख चौकात फलक उभारून सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना फशी पडू नका, जर फसवणूक झालीच तर तातडीने 1930 या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन करण्यात येत आहे.
विजापूर पोलिसांनी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना ठळक सल्ले दिले आहेत
- स्क्रीन टाईम कमी करा, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पीएम किसान, बँक केवायसी अपडेट व वेडींग कार्डच्या नावे येणाऱ्या एपीके फाईल्सवर क्लिक करू नका, केलात तर तुमचा मोबाईल हॅक होतो. मोबाईलमधील बँक खात्यासह सर्व माहिती गुन्हेगारांकडे जाते.
- पोलीस अधिकारी, टेलिफोन अधिकारी, कुरियर कंपन्यांच्या नावे संपर्क साधत ‘तुम्ही परदेशाला पाठवलेल्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ आहे, त्यामुळे व्हिडिओ कॉल करून तुमची चौकशी करायची आहे, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे’, असे सांगत फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांपासून सावध रहा.
- अनोळखींसोबत तुमचे बँक खाते, डेबिट व क्रेडिट कार्ड नंबर, ओटीपी, युपीआय पिन, एम पिन आदींची माहिती शेअर करू नका.
- अनोळखींकडून येणारे एसएमएस, व्हॉट्सअॅप, ई-मेल लिंकवर क्लिक करू नका. गुगलवर दिसणाऱ्या वेगवेगळ्या आस्थापनांच्या कस्टमर केअर नंबर, ई-मेल आयडी वापरण्याआधी खात्री करून घ्या.
- ऑनलाईनच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज देण्याचे सांगणाऱ्या बेकायदा अॅपचा वापर करू नका. जादा नफा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या ऑनलाईन अॅप व वेबसाईटमध्ये गुंतवणूक करणे टाळा.
- ऑनलाईनच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे सांगून पैशांची मागणी करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पैसे देऊ नका. तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमच्या नावे भेटवस्तू आली आहे, ती मिळविण्यासाठी ठरावीक शुल्क भरायचे आहे, असे सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.









