वृत्तसंस्था/ पेयाँगचेंग (द. कोरिया)
येथे सुरू असलेल्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत शुक्रवारी पुरुष एकेरीत चीनच्या अनुभवी मा लाँगने भारताच्या मानव ठक्करचा उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 3-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.
चीनच्या लाँगने या सामन्यात भारताच्या 23 वर्षीय मानव ठक्करचा 11-9, 12-10, 11-5 अशा गेम्समध्ये पराभव केला. तत्पुर्वी मानव ठक्करने या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना द. कोरियाच्या 33 व्या मानांकित जुईचा 11-8, 8-11, 11-7, 11-7 असा पराभव केला होता. भारताच्या अनुभवी जी. साथीयान आणि शरथ कमल यांनाही प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली. मात्र महिलांच्या विभागात भारताच्या अहिका मुखर्जीने चीनच्या ऑलिम्पिक कास्यपदक विजेत्या चेन झिंगटाँगला विजयासाठी पाच गेम्सपर्यंत झुंजवले. पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या झेंगडाँग आणि गेयॉन यांनी मानव ठक्कर व मनुष शहा या भारतीय जोडीचा 11-5, 11-3, 11-5 त्याचप्रमाणे महिलांच्या दुहेरीत चीनच्या वेंग मेनयु आणि चेन मेंग यांनी भारताच्या अहिका व एस. मुखर्जी यांचा 11-5, 13-11, 12-10 असा पराभव केला. या स्पर्धेत सांघिक विभागात भारतीय पुरुष टेबल टेनिसपटूंनी कास्यपदक मिळवले होते.









