बिगर सरकारी संस्थांकडून आयोजन
पणजी : म्हादई नदीच्या भवितव्याचा विचार करून आता 20 मे रोजी मांडवीतीरी सुमारे सात किलोमीटर अंतराची मानवी साखळी करण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा हेरिटेज अॅक्टीव्ह ग्रुपच्या सदस्या हेता पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. पणजी येथे काल सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अर्थविस्ट कलेक्टिव्हच्या सदस्या मिरिअम क्रोशी, पर्यावरणप्रेमी तसेच गोव्याच्या खाजन सोसायटीच्या अध्यक्षा प्रो. एल्सा फर्नांडिस, सेव्ह म्हादई सेव्ह गोवा गोवा फ्रंटचे अॅड. हृदयनाथ शिरोडकर, प्रजल साखरदांडे उपस्थित होते. दि. 20 मे रोजी संध्याकाळी चार वाजता मांडवी नदीच्या काठावर प्रार्थना आयोजित केली आहे. त्यानंतर मिरामार तटाच्या टोकापासून पणजीतील सांता मोनिका जेटीपर्यंत सात किलोमीटर अंतराची मानवी साखळी करण्यात येणार आहे. या मानवी साखळीत सुमारे सात हजार गोमंतकीय जनता सहभागी होण्याची शक्यता आहे. मानवी साखळीत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी, कलाकारांनी चित्रे, कविता, गाणी, प्रदर्शन आणि वाळूच्या चित्रांच्या स्वऊपात कला सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी समुदायालाही मानवी साखळीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आपले हात, आपले हृदय, आपले विचार आपल्या म्हादई आईसाठी सेवा आणि संरक्षण करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यासाठी जनसमुदायाने एकजूटीने म्हादईसंकट घालवावे, असे आवाहनही एल्सा फर्नांडिस यांनी केले आहे. मानवी साखळीत सहभागी होणाऱ्यांना पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे कपडे घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांनी या समुदायात संगीतकारांना, म्हादईबाबत कथा सांगणाऱ्यांना, विविध शैलीतील कलाकारांना मानवी साखळी साईटवर सादरीकरण करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे अॅङ हृदयनाथ शिरोडकर म्हणाले.









