फॅशन शोमध्ये सर्वसाधारणपणे तरुण-तरुणेंचा सहभाग असतो. त्यांचा सहभाग असेल तरच असे शोज बघण्यास लोकांची गर्दी होते. तथापि, अलिकडच्या काळात बुजुर्गांचे किंवा वयस्कर लोकांचेही असे फॅशन शोज होत आहेत. वयस्कर लोकांनाही फॅशनेबल, ट्रेंडी लुक आणि कॅटवॉक आवडू लागले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या फॅशनशोजना लोकांचा पाठिंबाही बऱयापैकी मिळू लागला आहे.

तथापि, नायजेरिया या एका अत्यंत मागास देशात आयोजित झालेल्या अशा वयस्करांच्या फॅशन शोने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या शोचे आयोजन एका चित्रपट निर्मात्याने केले होते. या शो साठी त्याने मोठय़ा कल्पकतेने ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केला होता. कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करुन बुजुर्गांच्या सत्याभासी प्रतिमा तयार करण्यात आल्या होत्या, ज्या बुजुर्गांप्रमाणे भासत होत्या. या शोचे नाव फॅशन शो फॉर सिनीयर्स असे ठेवण्यात आले होते. या शोमधील पात्रे खरी नव्हती. ती केवळ आभासी होती. तरीही ती इतकी खरी वाटत होती की, लोकांना सांगूनही ते पटत नव्हते. त्यामुळेच हा शो चर्चेचा विषय बनला होता. या शोने सोशल मिडियावर बरीच लोकप्रियता मिळविली आहे. तसेच अशा तऱहेचे शो आता अधिक संख्येने पहावयास मिळतील असे बोलले जात आहे. या शोत सहभागी झालेल्या व्यक्ती कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून साकारण्यात आल्या असल्या तरी या शोची मांडणी आणि एकंदर योजना अशा प्रकारे होती की तो खऱयापेक्षाही खरा वाटत होता.
आता फॅशन डिझायनर्सच्या जगात या शोची चर्चा सुरु आहे. अनेक डिझायनर्स आता अशा प्रकारचे शो करण्याच्या मागे लागणार आहेत. हा एक नवा पायंडा पाडण्यात आला आहे, असे अनेक फॅशन तज्ञांचे मत आहे.









