वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील आघाडीची एफएमसीजी कंपनी, हिंदुस्तान युनिलिव्हरने गुरुवारी आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीत 5.97 टक्क्यांनी वाढून 2,768 कोटी झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो 2,612 कोटी होता. कंपनीने कामकाजातून 5.19 टक्के वाढीसह 16,296 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 15,497 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला होता. एफएमसीजी क्षेत्रात मागणी स्थिर राहिलेली असून मागणीत सुधारणेला वाव आहे. योग्य गुंतवणूक धोरणाच्या माध्यमातून या क्षेत्रात प्रगतीसाठी कंपनी सज्ज आहे. तिमाहीचा कालावधी कंपनीसाठी चांगला राहिला आहे, असे एचयुएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व एमडी रोहीत जावा यांनी म्हटले आहे.









