विराटची भेट घेतल्यानंतर विंडीज खेळाडूची आई भावूक
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 29 वे शतक झळकावले. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीज खेळाडूच्या आईने विराट कोहलीची भेट घेतली. यावेळी त्यांना अश्रू अनावर आले. विराटची गळाभेट घेतली अन् डोळ्यात अश्रू आले. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
सामन्यादरम्यान विंडीजचा यष्टीरक्षक जोशुआ डी सिल्वाने विराटला सांगितले होते की, त्याने या सामन्यात शतक झळकावे, अशी माझी इच्छा आहे. याचबरोबर त्याची आई फक्त विराटला पाहण्यासाठीच स्टेडियममध्ये आली आहे, असेही तो म्हणाला. विराटला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या जोशुआच्या आईने आपल्या मुलाला आधीच सांगितले होते की, ती फक्त विराट कोहलीसाठीच स्टेडियममध्ये येत आहे. आता तिचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जोशुआच्या आईने विराटची भेट घेतली. यावेळी विराटला भेटताच त्या खूपच भावूक झाल्या. यावेळी त्यांनी विराटची गळभेट घेतली, प्रेमानं गालावर चुंबनही घेतले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. जागतिक क्रिकेटमध्ये अनेकजण विराटचे चाहते आहेत. हीच गोष्ट विराटला महान खेळाडू बनवते. जोशुआच्या आई म्हणाली की, ही खूप मोठी गोष्ट आहे की, विराट त्यांच्या देशात येऊन क्रिकेट खेळत आहे.









