काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहनधारकांची गैरसोय : एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवल्याने वाहनधारकांना फटका
प्रतिनिधी / बेळगाव
लेंडीनाला ते जुने बेळगाव नाक्यापर्यंतच्या जुन्या धारवाड रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचा रस्ता करण्यात येत आहे. पण ठिकठिकाणी असलेल्या अडथळ्यांमुळे वाहनधारकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी दररोज होत आहे. वाहनधारकांच्या सुविधेसाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र सध्या या रस्त्यावर खूपच अडचणी निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येण्यासाठी जुन्या धारवाड रोडचा वापर केला जातो. या रस्त्यावरून अवजड तसेच सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा सुरू असते. बसमार्गदेखील असल्याने ठिकठिकाणी बसथांब्यांवर प्रवाशी घेण्यासाठी बस थांबतात. पण सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनांची कोंडी होऊन रांगा लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून काम पूर्णत्वास आले आहे.
दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने एका बाजूची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणापूर्वी शहरात येणारी अवजड वाहतूक राष्ट्रीय महामार्गापासून वळविणे आवश्यक होते. पण याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. गोवावेस चौकातून महात्मा फुले रोडमार्गे धारवाड रोडला येणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. शहराच्या मध्यवर्ती भागातून ये-जा करावी लागत असल्याने अवजड वाहनचालक खानापूर रोडऐवजी महात्मा फुले रोडने धारवाड रोडला येणे पसंत करीत आहेत. त्यामुळे धारवाड रोडवर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू केल्यापासून सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या आता दररोजची डोकेदुखी बनली आहे. याचा फटका स्थानिक व्यावसायिक आणि वाहनधारकांनादेखील बसत आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.









