दोन ते तीन तास वाहने अडकली : भाविकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
खणगाव येथील काळादेवीची यात्रा बुधवारी असल्यामुळे मोठÎा संख्येने भाविक सकाळपासून खणगाव येथे दाखल होत होते. त्यामुळे मुचंडी गावापासून खणगाव गावापर्यंत प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे खणगाव गावापर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागला. यामुळे अनेकांचे हाल झाले. बस व वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांची घालमेल झाली. गर्दी होणार हे माहिती असतानाही पोलीसांकडून कोणतेच नियोजन नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा सूर वाहनचालकांमधून उमटत होता.
काळादेवीची यात्रा मंगळवारी व बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली. मागील आठ दिवसांपासून सुरू असणाऱया पावसाने बुधवारी उघडीप दिल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली. बेळगाव – गोकाक मुख्य मार्गावर खणगाव असल्यामुळे वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतुक कोंडीत वाढ झाली. बेळगावहून गोकाकला तर गोकाकहून बेळगावला येणाऱया 10 ते 12 बस या वाहतुक कोंडीत अडकल्या होत्या.
दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यातच गोकाकवरून येणारी बस बंद पडल्याने वाहतुक कोंडीत वाढ झाली. त्यामुळे जेथून वाट मिळेल तेथून वाहने रेटली जात होती. अनेकांनी खनगाव येथून सुळेभावीमार्गे बेळगावमध्ये येणे पसंत केले. झालेली वाहतुक कोंडी पाहता जत्रेचे जेवण नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली.
बसमधील प्रवाशांची गैरसोय
बेळगाव ते गोकाक व गोकाक ते बेळगाव या दरम्यान धावणाऱया परिवहन मंडळाच्या बस वाहतुक कोंडीत अडकल्या होत्या. खनगावपर्यंत आलेल्या बस दोन ते अडीच तास कोंडीत अडकल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवासाला लागलेल्या वेळेमुळे बसमधील प्रवासी व वाहने रेटणारे वाहनचालक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग होत होते.











