विविध परिसरातील मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
बेळगाव : उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांची शाहूनगर परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. येथील गणेश चौक परिसरातून प्रचारफेरीस प्रारंभ करण्यात आला. माजी महापौर वंदना बेळगुंदकर व माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर यांनी अमर येळ्ळूरकर यांचे स्वागत करून पाठिंबा व्यक्त केला. येत्या निवडणुकीत शाहूनगरसह परिसरातील जनता आपल्या पाठिशी असल्याचे सांगून निवडणुकीत म. ए. समितीचा नक्कीच विजय होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. या प्रचारफेरीची सुरुवात सोमवारी सकाळी गणेश चौक परिसरातून करण्यात आली. रिक्षास्टँड, मार्कंडेयनगर, एपीएमसी, शाहूनगर आणि परिसरातील वसाहतींमधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. कित्येक वर्षांपासून उत्तर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी म. ए. समितीला गमवावी लागली. त्यामुळे अनेक भागातील समस्यांचे निवारण झाले नाही. विविध कॉलन्या निर्माण होत आहेत, पण विकासापासून वंचित आहेत. या वसाहतींचा विकास करण्यासह नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी दिले. म. ए. समितीच्या विजयासाठी सर्वांचे बहुमोल मत आवश्यक आहे. मतदारांनी मातृभाषेच्या रक्षणासह विकासासाठी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. या परिसरात प्रचारफेरी काढताना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे अमर येळ्ळूरकर यांना निवडून देण्याचे निर्धार व्यक्त केला. यावेळी परिसरातील मतदार व माजी नगरसेवक प्रचारफेरीत सहभागी झाले होते.









