स्लीपर कोच बसमधून 319 लिटर दारू हस्तगत
वार्ताहर /रामनगर
सध्या विधानसभा निवडणूक दरम्यान सर्व नाक्यांवर कडक तपासणी करण्यात येत आहे. गोवा येथून बेंगळूरला जाणाऱया स्लीपर कोच बसमधून 319 लिटर गोवा बनावटीची दारू अनमोड चेक नाक्यावर जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई अबकारी व पोलीस विभागाने संयुक्तपणे रविवारी केली. गोवा येथून बेंगळूरच्या दिशेने जाणारी खासगी स्लीपर कोच बस क्र. केए 01 एजे 2561 मध्ये दारूसाठा असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळताच रविवारी रात्री तपासणी करण्यात आली. बसच्या लगेज विभागात व्यवस्थितरित्या बॉक्स पॅकिंग करून दारू वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळले. सदर दारू वाहतूकप्रकरणी परशुराम सिद्धाप्पा कुरी (वय 44), कुमार चंद्रेया (वय 38), मनू के. व्ही. (वय 25), सर्व राहणार बेंगळूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई अबकारी उपनिरीक्षक श्रीकांत असोदे, सहकारी बाळकृष्ण के., आर. एन. नाईक, यू. एन. तुळजी तसेच रामनगर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, सहकारी चंद्रशेखर गुणी, राजू राठोड, राजू चलवादी आदींनी केली. या कारवाईत वाहनासह 34,32,610 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.









