अर्चना संगीत विद्यालयातर्फे आयोजन : उत्कृष्ट सादरीकरण
बेळगाव : अर्चना संगीत विद्यालयातर्फे येथील आयएमईआरच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सूर एक रंग अनेक’ या संगीत कार्यक्रमाला उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. मराठी, कन्नड, हिंदी तसेच लोकगीते सादर करण्यात आली. बालचमूंसह अनेक संगीतप्रेमींनी सूरमय स्वरात संगीत सादरीकरण केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अनिल चौधरी, संजीव अध्यापक, महेश इनामदार, कुसुमताई कुलकर्णी, दिलीप चिटणीस, प्रणव पित्रे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी श्रीरामावर आधारित नृत्य सादर करण्यात आले. यानंतर दास पदे म्हणण्यात आली.
संगीतालयाच्या कलाकारांकडून कबीर के दोहे तालमय नादात सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर बालचमूंकडून कुंभारी व्यवसायाला अनुसरून असणारे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुक्त केले. यावेळी जानपद गीते, कबीर के दोहे, युगल गीत, गीगीपदा, ठाकर गीत नृत्यासह सादर करण्यात आले. जानपद गीत, गोंधळ, पोवाडा, कव्वाली आदी गीते गाण्यात आली. आसामी संस्कृतीचे दर्शन घडविणारे बोडा नृत्य सादर करण्यात आले. ‘आम्ही ठाकर’ नृत्य सादर करून बालचमूंनी उपस्थितांकडून वाहव्वा मिळवली. यावेळी हार्मोनियम योगेश रामदास, ऑक्टोपॅड ढोलकी संतोष गुरव, तबला संतोष पुरी, गिटार सूर्या कुलकर्णी यांनी साथ दिली. सूत्रसंचालन नीना जठार, सुप्रिया जोशी, आशा यमकनमर्डी, रोहिणी बेंबळगी यांनी केले.









