रविवारी 5 बस धावल्या : पर्यटकांची आंबोली-गोकाकला पसंती
बेळगाव : पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी परिवहनने विशेष बसची सोय केली आहे. रविवारी वर्षा पर्यटनासाठी 5 बसेस आंबोली आणि गोकाक धबधब्यांकडे धावल्या. विशेषत: दुसरा, चौथा शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीदिवशी ही बससेवा उपलब्ध केली जात आहे. परिवहनने वर्षा पर्यटनासाठी विशेष बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धबेधबे प्रवाहित झाले आहेत. विविध पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांसाठी परिवहनने विशेष बस सोडल्या आहेत. रविवारी शासकीय सुटीदिवशी कुटुंबासह पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली होती. त्यामुळे आंबोलीसाठी तीन तर गोकाकला दोन बस धावल्या. आंबोलीसाठी प्रति व्यक्ती 290 रुपये आणि गोकाकसाठी 190 रुपये तिकीट शुल्क आहे. कर्नाटकात धबधब्यांवर बंदीमुळे महाराष्ट्रात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. दरम्यान, सुरक्षित प्रवास म्हणून काही पर्यटक बसने प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे विशेष बसना पर्यटकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. प्रवाशांसाठी मध्यवर्ती बसस्थानकात किंवा www.ksrtc.in या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकींग उपलब्ध आहे. त्यामुळे पर्यटकांनी तिकीट बुकिंगसाठी 7760991612 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परिवहनतर्फे करण्यात आले आहे.
विशेष बसची व्यवस्था- के. के. लमाणी (डीटीओ, परिवहन)
पर्यटकांसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी आंबोलीला तीन तर गोकाक धबधब्याकडे दोन बस धावल्या. प्रवाशांचा विशेष बसला प्रतिसाद मिळू लागला आहे. दुसरा, चौथा शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीदिवशी ही बससेवा उपलब्ध आहे.









