अटल ग्राम विकास संस्थेचा उपक्रम : गेल्या 10 वर्षापासून भरविला जातोय बाजार
मडगाव : गणेश चतुर्थीपर्यंतच्या काळात ‘माटाळी’ सजवण्यासाठी ठळकपणे वापरण्यात येणारी सर्व पारंपारिक फळे, वन्य उत्पादने आणि फुले एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या वार्षिक माटोळी बाजाराचे उद्घाटन काल रविवारी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते मडगावच्या लोहिया मैदानावर करण्यात आले. मडगाव येथील माटोळी बाजार हा अटल ग्राम विकास संस्थेतर्फे 10 वर्षापासून दरवषी आयोजित केला जातो. सांगे तालुक्यातील नेत्रावळी गावचे शेतकरी आणि महिला या माटोळी बाजारात सहभागी होत असतात. जंगलात मिळणाऱ्या विविध वनस्पती तसेच पारंपारिक फळे आणि खाद्य पदार्थ या बाजारात उलपब्ध केले जातात. बरीच उत्पादने ही सेंद्रीय असल्याने त्यांना चांगली बाजारपेठ मिळत असते. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, माटोली बाजार दुर्गम खेड्यातील महिलांना विपणन कौशल्ये शिकण्यासाठी आणि त्याच बरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
गेल्या 10 वर्षापासून स्थानिक शेतकरी आणि नेत्रावली येथील पारंपरिक विव्रेते मडगाव येथील माटोळी बाजारात सहभागी होऊन माटोळीच्या सजावटीसाठी त्यांच्या नैसर्गिक उत्पादनांचे प्रदर्शन करत आहेत. माटोळी बाजार ही संकल्पना आता राज्यभर ऊजवली जात आहे, असेही ते म्हणाले. आमदार दिगंबर कामत यांनी स्थानिक विव्रेत्यांना त्यांच्या पारंपरिक उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देत अशा बाजाराचे आयोजन केल्याबद्दल अटल ग्राम विकास संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी माहिती दिली की, माटोळी बाजार मडगाव आणि आसपासच्या लोकांना विविध प्रकारचे पारंपारिक आणि वन्य उत्पादन एकाच छताखाली उपलब्ध करून देते असल्याने लोकांची चांगली सोय होत असते. अटल ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सुभाष वेळीप यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. यावेळी फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक, मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ तसेच नगरसेविका रोनिता आजगांवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.









