42 हून अधिक कंपन्यांचा सहभाग : 4 हजार इच्छुकांची उपस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘रोटरी महारोजगार मेळावा-2023’ मध्ये अनेक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. गुजरात, बेंगळूर, विजापूर, हुबळी, बेळगाव येथील 42 हून अधिक कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
दहावी-बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शनिवारी रोटरी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्याचे हे पहिलेच वर्ष असून विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या रोजगार मेळाव्यामध्ये 4 हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले. जिमखाना हॉल येथे प्रत्येक कंपन्यांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत होते. बेळगावच्या मुलांना नोकरी शोधण्यासाठी मुंबई, पुणे, बेंगळूर येथे जावे लागत असल्याने तेथील कंपन्या बेळगावमध्ये मुलाखतीसाठी दाखल झाल्या होत्या. स्टार्टअप, फार्मा, हॉस्पिटॅलिटी, टेक्स्टाईल, रिटेल, बँकिंग, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, बीपीओ, ट्रॅव्हल अँड टुरिझम यासारख्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या असून कंपन्यांकडून त्यांना गुणवत्तेनुसार पुढील मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, विजयकुमार पाटील, निखिल चौगुले, शिवानंद पाटील, विजयकुमार के., डी. बी. पाटील, प्रा. एस. एन. पाटील, योगेश मुतगेकर, महेश अनगोळकर, के. बी. पाटील, सोमनाथ कुडचीकर, शिरीष गुमास्ते, सपना मरबद, शशीधर पाटील, लोकेश होंगल, कल्लाप्पा तवनोजी यांनी मेहनत घेतली.









