शिवाजीनगर, गांधीनगर परिसरात जल्लोषी वातावरणात दौडचे स्वागत : सर्वत्र भगवेमय वातावरण : युवकांबरोबरच युवती-बालकांचाही सहभाग
बेळगाव : तरुणांमध्ये देशप्रेमाचे बीज रोवणाऱ्या दुर्गामाता दौडला दुसऱ्या दिवशीही शिवभक्तांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात दुर्गामातेचा जागर करत हजारोंच्या संख्येने युवापिढी सहभागी झाली होती. शिवाजीनगर, गांधीनगर परिसरात जल्लोषी वातावरणात दौडचे स्वागत झाले. रांगोळ्या व फुलांच्या आरासमुळे मंगलमय वातावरण तयार झाले होते. सोमवारी चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरापासून दौडची सुरुवात झाली. खडेबाजारचे डीसीपी अरुणकुमार कोळूर व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. यानंतर काकतीवेस, खडक गल्ली, चव्हाट गल्ली, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, किल्ला तलाव रोड, गांधीनगर या परिसरात उत्साहात दौडचे स्वागत करण्यात आले. जागोजागी भल्या मोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात दौडची सांगता झाली. तत्पूर्वी महार रेजिमेंटच्यावतीने दौडचे स्वागत करण्यात आले. कर्नल विक्रमसिंग सांखला, एसीपी नारायण बरमणी यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. यावेळी सुभेदार मेजर किशनकुमार सिंग उपस्थित होते. यानंतर ध्येयमंत्र म्हणून दौडची सांगता झाली.
उद्याचा दौडीचा मार्ग…
नेहरुनगर बसवाण्णा मंदिर येथून दौडला प्रारंभ होणार असून सदाशिवनगर पहिला मुख्य क्रॉस, दुसरा क्रॉस, दुसरा मुख्य क्रॉस, चौथा क्रॉस, हरिद्रा गणेश मंदिर रोड, आंबेडकरनगर, गणेश चौक, मरगाईनगर, सदाशिवनगर पहिला मुख्य चौथा क्रॉस, तिसरा क्रॉस, दुसरा क्रॉस, नेहरुनगर तिसरा क्रॉस, रामदेव हॉटेल कॉर्नर, दुर्गामाता रोड, रामनगर, अशोकनगर, सुभाषनगर, शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिरात सांगता होणार आहे.









