नंदगड लक्ष्मीदेवी यात्रोत्सव : सजविलेल्या आंबील गाड्यांचा समावेश : मिरवणूक पाहण्यासाठी लोटली मोठी गर्दी
वार्ताहर / नंदगड
नंदगड येथील लक्ष्मीदेवी यात्रेचा शनिवारी अकरावा दिवस तरीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवार असल्याने नंदगडसह तालुक्याचा गावागावांतील सरकारी नोकर व शालेय विद्यार्थी यात्रा उत्सवात सहभागी झाले होते. त्यातच आंबील गाडे मिरवणूक काढण्यात आल्यामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. वाद्यांच्या गजरात आंबील गाड्यांसमोर तऊण व तऊणांनी ठेका धरला होता. आंबील गाडे मिरवणुकीतील आकर्षक देखावे पाहण्यासाठी भाविकांनी नंदगडमध्ये प्रचंड गर्दी केली होती. लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीने दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी 7 वा. आंबील गाड्यांच्या मिरवणुकीला सुऊवात झाली. एका पाठोपाठ एक असे आंबील गाडे मिरवणुकीत सहभागी झाले होते. सर्वप्रथम देवरकर बन यांचा आंबिल गाडा, त्यानंतर जुनेपाटील बन यांचा आंबिल गाडा, सातगावडा बन, बापू गावडा बन, वरची गल्ली, भातकांडे गल्ली आंबील गाडा व कोलेकर बंधूंनी सादर केलेल्या आंबील गाड्यांचा समावेश होता.
देवरकर बन आंबिल गाड्यासमोर स्वरांगण ढोल ताशा पथक येळ्ळूर यांचे वाद्य, तर लक्ष्मी-विष्णू अवतार सादर करण्यात आला होता. जुने पाटील बन यांनी विद्युत रोषणाई व डॉल्बीच्या आवाजात आपला आंबील गाडा घोड्याच्या रथावर बसलेले राम, सीता, लक्ष्मण, हनुमानसहित अयोध्या आगमनाचा देखावा सादर केला होता. सातगावडा बन यांनी रथात बसलेल्या विठ्ठल-रखुमाईची सेवा करणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा देखावा सादर केला होता.
बापुगावडा बन यांनी सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा व श्री कृष्णाने अर्जुनाला केलेला गीतेचा उपदेश हे दृश्य दाखवलं होतं. वरची गल्ली नागरिकांनी रथात श्रीराम, लक्ष्मण व सीता सिंहासनावर बसलेला देखावा सादर केला होता. तर कोलेकर बंधूंनी हत्तीवर स्वारी हा देखावा सादर केला होता. भातकांडे गल्लीने छत्रपती शिवाजीराजांना भवानीमातेकडून तलवार देण्याचा देखावा सादर केला होता. प्रत्येक आंबील गाडेवाल्यांनी डॉल्बी आवर्जून आणली होती.
आंबील गाडा मिरवणुकीत टाळ मृदंगांच्या गजरात भजन करणारे वारकरी सहभागी झाले होते. प्रत्येक बनातील लोकांनी वेगवेगळा पोशाख परिधान केला होता. महिलांनी एकच प्रकारचा पोशाख केला होता. आंबील गाड्यांच्या मिरवणुकीत युवक व युवतींनी नृत्याचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत आंबील गाडा मिरवणूक सुरूच होती. भगवे फेटे व भगवे झेंडे यामुळे परिसर भगवामय झालाहोता.
आज यात्रेचा शेवटचा दिवस
नंदगड लक्ष्मीदेवीची यात्रा दि. 12 फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे. देवीचा विवाह सोहळा, देवीची हातावरून मिरवणूक, रथोत्सव, गदगेवर स्थानापन्न, ओट्या भरण्याचा कार्यक्रम, आंबील गाडे मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रमांसह विविध मनोरंजनाचेही कार्यक्रम यात्रा काळात झाले. रविवार दि. 23 रोजी सायंकाळी लक्ष्मीदेवीची गदगा परिसरात मिरवणूक व सायंकाळी 7 वाजता लक्ष्मीदेवीचे सीमेकडे प्रयाण होऊन यात्रेची सांगता होणार आहे.









