शक्ती योजनेंतर्गत महिलांचा प्रवास सुसाट : लांब पल्ल्यासाठी बुकिंग
प्रतिनिधी / बेळगाव
महिलांना मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे परिवहनच्या बसेसना उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. शिवाय दैनंदिन आगाऊ बुकिंग करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. राज्यात सर्वत्र मोफत बसप्रवास सुरू झाल्याने बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एकूण बुकिंग करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून बेंगळूर, म्हैसूर, बळ्ळारी, चिक्कमंगळूर, उडुपी, हैद्राबाद, तिरुपती, दावणगेरे, बागलकोट आदी ठिकाणी बुकिंग वाढू लागले आहे. विविध ठिकाणी बसेस धावू लागल्या आहेत. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. विशेषत: धार्मिक आणि पर्यटनस्थळांना गर्दी होऊ लागली आहे. महिलांना मोफत प्रवास दिला जात असल्याने लांब पल्ल्याच्या बसेसना महिलांची संख्या वाढू लागली आहे. त्याबरोबरच रात्रीच्या प्रवासासाठी धावणाऱ्या वातानुकूलित बसमध्येदेखील बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
एकाच मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना शक्ती योजनेचा लाभ झाला आहे. प्रवास मोफत मिळत असल्याने सुखकर होऊ लागला आहे. नोकरदार, कामगार, बांधकाम क्षेत्रातील महिला, भाजी विक्रेत्या आणि इतर व्यवसाय आणि उद्योगधंदा करणाऱ्या महिलांना मोफत बसप्रवासाचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास खर्चाची बचत होऊ लागली आहे. त्याबरोबरच विद्यार्थिनींनाही मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बसपास काढायची कटकट थांबली आहे. शिवाय बसपाससाठी दिल्या जाणाऱ्या पैशांची बचत झाली आहे.
बेळगाव बसस्थानकातून दैनंदिन 630 हून अधिक बसेस धावू लागल्या आहेत. या बसेससाठी महिलांच्या बुकिंगची संख्या वाढू लागली आहे. दैनंदिन चिकोडी, निपाणी, हुक्केरी, हिडकल, गोकाक, बळ्ळारी, हुबळी–धारवाड येथे ये–जा करणाऱ्या महिलांना ही सुविधा लाभदायी ठरू लागली आहे.
के. के. लमाणी (डीटीओ परिवहन)
मागील एक महिन्यात बुकिंग करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. लांब पल्ल्यासाठी महिलांकडून बुकिंग केले जात आहे. सर्वत्र मोफत बसप्रवास सुरू असल्याने महिलांचा प्रतिसाद वाढला आहे. विशेषत: धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे आणि इतर ठिकाणी महिलांची संख्या वाढू लागली आहे.









