वार्ताहर/कडोली
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने कडोली येथे सुरू असलेल्या श्री दुर्गामाता दौडीस बालगोपाळांसह थोर शिवभक्तांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीच्या दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडोलीतील प्रत्येक गल्ल्या पताक्या, झेंडे, शुभेच्छा फलक, विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. दौडीच्या मार्गावर स्वागतासाठी ठिकठिकाणी युवक मंडळांनी आणि महिला वर्गानी पुजेचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठातून किसान अॅग्रो केंद्राचे सुधीर खनगौडा देसाई, प्रगतशील शेतकरी उमेश यलाप्पा कुट्रे यांच्या हस्ते शस्त्रपुजन तर युवा कार्यकर्ता मदन मंगानी पावले आणि नितेश जोतिबा होनगेकर यांच्याहस्ते श्रीमठ गदगी व शिवप्रतिमा पुजन यांच्या हस्ते झाल्यानंतर श्री दुर्गामाता दौडीला सुरुवात करण्यात आली. सदर दौड कलमेश्वर गल्लीमार्गे कलमेश्वर मंदीरात नेण्यात आली. त्यानंतर लक्ष्मी गल्ली, पेठ गल्ली, रामनगर होऊन अयोध्यानगर येथे आणण्यात आली. या ठिकाणी आरतीनंतर शिवपुतळ्याजवळ दौडची सांगता झाली.









