राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून इंदूरमध्ये आयोजन : कर्नाटक-तामिळनाडूतही निषेध
वृत्तसंस्था / इंदूर
मध्यप्रदेशातील इंदूर या शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रचंड सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यात आला आहे. या सभेला अडीच लाख लोक उपस्थित होते अशी माहिती देण्यात आली. बुधवारी ही सभा पार पडली.
मध्यप्रदेशप्रमाणे कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही संघाच्या वतीने निषेध कार्यक्रमांचे आयोजन अनेक शहरांमध्ये करण्यात आले होते. तसेच मध्यप्रदेशात भोपाळ आणि उज्जैन शहरांमध्येही हजारो संघ स्वयंसेवकांनी शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करुन बांगलादेशातील घटनांवरील आपला संताप व्यक्त केला. निदर्शनांच्या काळात या शहरांमधील व्यापारी आस्थापने आणि इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या निदर्शनांना आणि सभांना सर्वसामान्य जनतेचाही मोठा प्रतिसाद लाभल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
चेन्नईत हिंदू संघटना एकत्र
तामिळनाडूतील विविध हिंदू संघटनांनी एकत्र येऊन या राज्याची राजधानी चेन्नई येथे विशाल सभा आणि निदर्शनांचे आयोजन केले होते. या राज्यातील सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन ‘बांगलादेश हिंदू अधिकार पुनर्प्राप्ती समिती’ या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या वतीने राज्यभर मोठ्या प्रमाणात निषेध कार्यक्रमांचे आयोजन आगामी काही दिवसांमध्ये केले जाणार आहे.
भारतभर निदर्शने होणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदू संघटनांनी बांगला देशातील हिंसाचाराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आणि विश्वसमुदायाचे लक्ष त्याकडे वेधण्यासाठी शांततापूर्ण मागाने देशभर निदर्शने आणि निषेध सभा घेण्याचे ठरविले आहे. लवकरच यासंबंधीचा सविस्तर कार्यक्रम घोषित केला जाणार आहे.
ब्रिटिश संसदेत घुमला आवाज
मंगळवारी ब्रिटनच्या संसदेतही बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचारासंबंधी चर्चा करण्यात आली. तेथे विरोधी पक्ष असणाऱ्या हुजूर पक्षाने या अत्याचारांचा निषेध केला. या पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी बांगला देश प्रशासनावर कडाडून टीका केली. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर बांगला देशात हिंदूंना संपविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हिंदूंचे शिरकाण केले जात आहे. विश्वसमुदायाने यावर कठोर कृती केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ब्रिटनमध्ये सत्ताधारी असणाऱ्या मजूर पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन वेस्ट यांनीही या हिंसाचारासंबंधी चिंता व्यक्त केली. भारताशी आम्ही संपर्कात असून योग्य ती कृती केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. गेल्या महिन्यात वेस्ट यांनी बांगला देशचा दौरा केला होता. त्यावेळी हिंदूंचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन मोहम्मद युनूस यांनी दिले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत कठोर कारवाई करणार…
बांगलादेशात हिंदूविरोधी अत्याचार थांबले नाहीत, तर भारताला कठोर कारवाई करण्याची वेळ येणार आहे. यासाठी भारत सज्ज आहे. बांगलादेशातील धर्मांध दहशतवाद्यांनी हे लक्षात ठेवावे, की हिंदूंवरील अन्याय भारत सहन करु शकणार नाही. दहशतवाद्यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा इंदूर येथील विशाल सभेत मध्यप्रदेशच्या माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उषा ठाकूर यांनी दिला आहे. भारताला लवकरच हालचाली कराव्या लागणार आहेत, असे मत अनेक मान्यवरही गेल्या दोन दिवसांपासून व्यक्त करीत आहेत. भारताच्या संसदेतही बांगला देशातील स्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.









