दर 100 चौकिमीमध्ये 18 वाघ
वृत्तसंस्था/ काझिरंगा
आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. आता हे जगात वाघांच्या संख्येप्रकरणी तिसऱ्या क्रमांकाचे ठिकाण ठरल्याची माहिती काझिरंगा पार्कच्या नव्या रिपोर्ट स्टेट्स ऑफ टायगर्स इन काझिरंगा 2024 मध्ये देण्यात आली आहे. आता या पार्कमध्ये दर 100 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात 18 वाघ असल्याची पुष्टी देण्यात आली आहे. वाघांच्या गणनेसाठी डिसेंबर 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण अभयारण्यात 1300 चौरस किलोमीटर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. या कॅमेऱ्यांच्या मदतीने 148 प्रौढ वाघांची ओळख पटविण्यात आली, यात 83 मादी, 55 नर असून 10 वाघांची ओळख स्पष्ट झालेली नाही. हे सर्वेक्षण नॅशनल टायगर कंजर्वेशन अथॉरिटीच्या दिशानिर्देशानुसार करण्यात आले आहे.
काझिरंगा पार्कच्या फील्ड डायरेक्टर सोनाली घोष यांनी या कामगिरीला संरक्षण संदेश ठरविले. हा आकडा केवळ संख्या नसून हे काझिरंगाच्या स्वस्थ पर्यावरणीय व्यवस्था आणि यशस्वी संरक्षणाचे प्रतीक आहे. पुढील काळातही अशाप्रकारचे प्रयत्न जारी ठेवून जैवविविधता सुरक्षित ठेवावी लागणार आहे. 2022 च्या तुलनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे घोष यांनी सांगितले आहे.
काझिरंगामध्ये आता एकूण 148 वाघ आहेत. विश्वनाथ वाइल्डलाइफ डिव्हिजनमध्ये पहिल्यांदा सर्वेक्षण झाले असून तेथे 27 वाघ आढळले आहेत. ईस्टर्न आसाम वाइल्डलाइफ डिव्हिजनमध्ये 2022 साली 104 वाघ होते, ही संख्या आता वाढून 115 वर पोहोचली आहे. नागाव विभागात वाघांची संख्या 6 कायम आहे.
वाघांच्या संख्यावाढीमागील कारण
काझिरंगामध्ये वाघांच्या संख्या वाढीचे मुख्य कारण त्याच्या अधिवासाचा विस्तार आहे. याच्या अंतर्गत उद्यानात 200 चौरस किलोमीटरचे नवे क्षेत्र सामील करण्यात आले आहे. यात 12.82 चौरस किलोमीटर अतिक्रमणमुक्त भूमीही सामील आहे. तर उद्यानात नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले असून याच्या अंतर्गत ड्रोन, इन्फ्रारेड कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक आय यासारख्या तंत्रज्ञानाद्वारे देखरेख वाढविण्यात आली आहे. याचबरोबर या कामगिरीत महिला वनरक्षकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच्या अंतर्गत वन दुर्गाच्या स्वरुपात प्रशिक्षित 113 महिला कर्मचारी याच कामात सामील आहेत.









