ग्राहकांनी विचारला हेस्कॉमला जाब : कार्यालयात वादावादीचे प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील महिन्याप्रमाणेच या महिन्यातही वाढीव वीजबिले देण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. काही नागरिकांनी तर मंगळवारी रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला. यामुळे हेस्कॉम कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
जून महिन्यात देण्यात आलेल्या विद्युतबिलांमध्ये मोठी वाढ झाली होती. तब्बल 50 ते 60 टक्के बिलामध्ये वाढ करण्यात आल्याने बिल भरायचे कसे? असा प्रश्न नागरिकांसमोर होता. हेस्कॉमकडून एफएससीच्या दरात वाढ करण्यात आल्याने बिलामध्ये वाढ झाली असून पुढील महिन्यात बिल कमी होईल, असे हेस्कॉमकडून सांगण्यात आले होते. यामुळे नागरिकांनी वाढीव वीजबिल भरले. परंतु जुलै महिन्यात देण्यात आलेल्या वीजबिलांमध्येही पुन्हा वाढ करण्यात आल्याने नागरिक संतापले आहेत.
केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही वाढीव वीजबिल आले आहे. पुढील महिन्यापासून घरगुती वीजग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार असली तरी या महिन्यातील वीजबिल पाहून डोळे पांढरे झाले आहेत. प्रत्येक महिन्यात हजार ते बाराशे रुपये वीजबिल आल्यास घरखर्च कसा चालविणार? असा प्रश्न गृहिणींसमोर आहे. त्यामुळे हेस्कॉमच्या नेहरुनगर व गांधीनगर येथील कार्यालयांसमोरही नागरिकांची गर्दी होत आहे.
किरकोळ वादावादीचे प्रकार
रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयात मंगळवारी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. वीजबिल अधिक आल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला जात होता. यामुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत होते. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कार्यालयात गर्दी वाढली होती. यामुळे गर्दीच्यावेळी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली जात होती.
काही ग्राहकांचे वीजबिल तांत्रिक कारणाने वाढले होते. अशांचे बिल कमी करण्यात आले. तीन महिन्यांचे बिल व त्यांनी वापरलेले युनिट याची सरासरी करून बिलात कपात करण्यात आली.