विजेत्यांना मिळणार 2.24 दशलक्ष डॉलर्स
वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठ संघांच्या स्पर्धेसाठीच्या बक्षीस रकमेत 53 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्यांना 2.24 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रोख रक्कम मिळणार आहे.
विजेत्यांची रक्कम भारतीय चलनात 20 कोटींच्या जवळपास असेल. उपविजेत्या संघाला त्याच्या अर्धी रक्कम 1.12 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (9.72 कोटी रुपये), तर उपांत्य फेरीतील प्रत्येक पराभूत संघाला 5 लाख 60 हजार अमेरिकन डॉलर्स (4.86 कोटी रुपये) मिळतील. एकूण बक्षीस रक्कम 6.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 60 कोटी रुपये) झाली आहे.
मोठ्या बक्षीस रकमेतून आयसीसी खेळात गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या स्पर्धांची जागतिक प्रतिष्ठा राखण्यासाठी सतत वचनबद्ध आहे हे दिसून येते, असे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार असलेल्या या स्पर्धेपूर्वी एका निवेदनात म्हटले आहे. गट फेरीतील प्रत्येक विजयी संघास 34,000 डॉलर्स (30 लाख रु.) इतकी रक्कम मिळवून देईल.
पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर राहणाऱ्या संघांना प्रत्येकी 3 लाख 50 हजार डॉलर्स (3 कोटी रु.), तर सातव्या आणि आठव्या स्थानावर राहणाऱ्या संघांना प्रत्येकी 1 लाख 40 हजार डॉलर्स (1.2 कोटी रु.) मिळतील. याव्यतिरिक्त या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्व आठ संघांना प्रत्येकी 1 लाख 25 डॉलर्स (1.08 कोटी रु.) मिळतील.
या स्पर्धेच्या माध्यमातून 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. तथापि, पाकिस्तानमधील सुरक्षाविषयक चिंतेमुळे भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पुऊष संघाची मोहीम 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविऊद्ध सुरू होईल. पाकिस्तानातील सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे होतील.
या स्पर्धेत आठ संघांना चार-चार अशा दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक गटातील शीर्ष दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पुऊषांची चॅम्पियन्स ट्रॉफी 2009 ते 2017 पर्यंत दर चार वर्षांनी आयोजित केली गेली, परंतु कोविडमुळे व्यत्यय आला आणि पुढे ही स्पर्धा आवश्यक आहे की नाही यावरील चर्चांमुळे ती पुढे ढकलण्यात आली. या स्पर्धेने सर्वप्रथम 1998 मध्ये द्वैवार्षिक स्पर्धा म्हणून पदार्पण केले होते. महिलांची चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 मध्ये टी-20 स्वरूपात पदार्पण करेल.









