तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी भरपाई द्या, तहसीलदारांना निवेदन
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे कापणीयोग्य झालेले भात पावसात भिजून कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कारिवडे गावच्या सरपंच सौ. आऱती अशोक माळकर यांनी सावंतवाडीी चे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात सौ. माळकर म्हणतात, पिक विमा योजनेचे प्रस्ताव मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत तात्काळ करून घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे सोपे होईल. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीही आपल्या नुकसानीची नोंद तात्काळ कृषी सहाय्यक व तलाठी कार्यालय यांचेकडे करावी असे आवाहनही केले आहे.









