शेतकरी हवालदिल : बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर/गुंजी
गुरुवारी रात्री येथील ऊसपिकाचे हत्तींकडून प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील शेतकरी जैनू नाळकर यांच्या ऊसपिकात नायकोलच्या बाजूने आलेल्या हत्तींनी प्रवेश करून ऊस खाऊन, तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सदर शेतकरी ऊस मळ्यातच वरच्या बाजूला असलेल्या घरामध्ये वास्तव्यास होता. मात्र अचानकपणे तीन ते चार हत्तींनी मळ्यातील निम्म्याहून अधिक उसाचे रातोरात नुकसान केले आहे.
वास्तविक गुंजी परिसरात जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करणे बंद केले आहे. मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. त्यामधील हा एकमेव उसाचा मळा आहे. दोन वर्षांपूर्वी सदर शेतकऱ्यांच्या उसाचे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता हत्तीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने सदर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली असल्याचे सांगितले जात आहे. तरी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
हत्तींच्या बंदोबस्ताची गरज
आठवड्यापूर्वीच करंबळ, जळगा भागात उच्छ्दा मांडलेल्या एका हत्तीला वन खात्याकडून पकडण्यात आले होते. त्यानंतर चारच दिवसात पुन्हा त्या ठिकाणी दुसरे हत्ती दाखल झाले होते. तेच हत्ती सावरगाळी, नायकोल मार्गे गुंजीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. शुक्रवारी त्यांचा मुक्काम नायकोल जवळील एका तलावात होता असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा व येथील जनतेला भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.









