वार्ताहर/किणये
मच्छे गावातील जागृत देवस्थान ब्रम्हलिंग यात्रेला मंगळवारी सायंकाळी भाविकांची अलोट अशी गर्दी झाली होती. हर हर महादेवाच्या गजरात सायंकाळी इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. देवस्थान परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मच्छे गावातील जागृत ब्रह्मलिंग यात्रेला सोमवारपासून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुऊवात झाली. सोमवारी सायंकाळी गावात इगळ्यांसाठी लागणाऱ्या गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक काढताना गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोड्या जुंपल्या होत्या.
मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळी गावात पालखी मिरवणूक काढून गावातील सर्व देवतांची पूजा-चर्चा करण्यात आली. त्यानंतर ही पालखी मिरवणूक मंदिराजवळ आली. ब्रम्हलिंग मंदिरात अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. सायंकाळी इंगळ्यांचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.हर हर महादेव असा गजर करत भाविक इंगळ्यांतून पळताना दिसत होते. बरेच जण आपला नवस, उपवास करतात. हे देवस्थान अतिशय जागृत आहे. सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आईक्रीम, खेळणी, खाऊ आदी विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. महिला व बालचमूंनी याचा आनंद घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत मंदिर परिसरात गर्दी दिसून आली.









