बाजारात पूजेचे विविध साहित्य उपलब्ध : झेंडू विक्री ५० रूपयाने
सांगली : आज असणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरोघरी पूजा होते. तसेच व्यापारीही आपल्या पेढीवर पूजन करतात. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी शहरातील बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. तर काही व्यापाऱ्यांनी व अनेक नागरिकांनी अमावस्या लागल्याने सोमवारीच लक्ष्मी पूजा उरकून घेतली.
बाजारात सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यामध्ये दुकानासमोर लावण्यात येणाऱ्या नारळाच्या झावळ्या, ऊस, केळीचे खूंट, तसेच आंब्याची पानांची डहाळे, झेंडूची फुले, प्लास्टिक तोरणे, हार, माळा, पूजेचे साहित्य, लक्ष्मीदेवीचे फोटो, रांगोळी, नारळ, अगरबत्ती, सुवासिक धूप, आदी सर्व साहित्यांची रेलचेल दिसून येत आहे.याच्यासह पूजा सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांच्या खरेदीसाठीही नागरिकांनी गर्दी केली होती.
मारुती चौक, बालाजी चौक, नगरपालिका परिसर, वखारभाग परिसर, मार्केटयार्ड परिसर, नेमीनाथ नगर परिसर आदी भागात व्यावसायिकांचे विविध साहित्यांचे स्टॉल सजले होते. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी बाजारात केळीचे खुंट, ऊस, नारळाच्या झावळ्या, झेंडू व फुलांचे विविध हार विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. तसेच विविध प्रकारची पाच फळे यांचीही विक्री सुरू आहे. बाजारात झेंडूचा दर ४० ते ५० रूपये किलो आहे.
तर विविध पाच फळांचेही दर ५० ते ७० रूपये आहे. या लक्ष्मीपूजनाबरोबरच व्यापारी पेढ्यांवर नवीन वह्यांचे पूजन करण्यात येते. यासाठी मुहुर्तावर वही खरेदीसाठीही बाजारात नागरिकांनी गर्दी केलीआहे. यामध्ये रोजमेळ, रोजकिर्द, ताळेबंद, डायरी, नवीन कॅलेंडर, यांचा समावेश आहे.








