वार्ताहर/नंदगड
गणेश चतुर्थीचा सण आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यातच बुधवार दि. 27 रोजी गणेश चतुर्थी आहे. नंदगड येथील आठवडी बाजार बुधवारीच भरतो. यापुढे बुधवार मिळणार नाही, म्हणून सणाच्या बाजारासाठी बुधवारी नंदगड बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. गणेश चतुर्थी सणाला लागणारा किराणा बाजार, कपडे, अन्य सजावटीचे साहित्य खरेदीसाठी सकाळी दहा वाजल्यापासून नागरिक नंदगड येथील मुख्य बाजारात येताना दिसत होते. बाजारासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका व सहकारी पतसंस्थांच्या शाखेतून सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती. दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाजारपेठत खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यातही दिवसभर पाऊस राहिल्याने खरेदीदार व विक्रीदार पावसात भिजत होते. तरीही कसेबसे आपली खरेदी करण्यात येत होती. सणाचा बाजार राहिल्याने भाजीपाल्यांचे दर मात्र वाढले आहेत. त्यातच नारळाचा दरही दुप्पटीने वाढला आहे. अन्य काही वस्तूंचे दरही काही प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे बाजाराकरिता आपले बजेट बसवणे गोरगरीब जनतेला आव्हान ठरत आहे.
बकऱ्यांच्या बाजारात मात्र शुकशुकाट
गणेश चतुर्थी सणात ऋषिपंचमी दिवशी बकऱ्यांच्या जेवणावळीचा बेत असतो. एखाद्या देवाच्या नावाने बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा खानापूर तालुक्यात आहे. त्यामुळे दरवर्षी बकरी विक्री करणारे दलाल वेगवेगळ्dया भागातून विक्रीसाठी बकरी घेऊन येतात. या भागातील लोकांकडून बकरी खरेदी केली जातात. यावर्षी मात्र केवळ मोजक्याच स्थानिक विक्रेत्यांनी आणली होती. बाहेरचे विक्रेते बकरी विकण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे बकरी बाजारात शुकशुकाट जाणवत होता.









