बेळगाव शहरासह ग्रामीण भाग गारठला : पारा 12 अंशावर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव हे दुसरे महाबळेश्वरच आहे. कारण या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण, थंड हवामान असल्यामुळे बेळगावला साऱ्यांचीच पसंती असते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लहरी हवामानामुळे बेळगावकरांनाही अनेकवेळा समस्यांचा सामना करावा लागत आहे. अचानक ढगाळ वातावरण, अचानक पाऊस आणि अचानक थंडी पडू लागली आहे. त्यामुळे ऋतूचक्रमानच बदलले की काय? अशी चर्चा नेहमीच सुरू असते. आता गेल्या चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली असून शहरासह ग्रामीण भागदेखील गारठला आहे.
गेल्या चार दिवसांमध्ये यावर्षातील सर्वात कमी अशा किमान तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी 12 अंशावर पारा पोहोचला होता. त्यामुळे सर्वत्रच गारठा निर्माण झाला. सायंकाळी 5 नंतरच थंडीला सुरुवात होत आहे. रात्री 9 नंतर तर अधिकच थंडी असते आणि पहाटेच्यावेळी साऱ्यांनाच हुडहुडी भरलेली असते. या थंडीमुळे मार्निंग वॉकर्सची संख्यादेखील कमी झाल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत बेळगाव परिसरात थंडी असते. मात्र यावर्षी डिसेंबरमध्येही पाऊस पडला आहे. त्यामुळे थंडीच गायब झाली होती. मध्यंतरी काही दिवस थंडी पडली. मात्र ती थंडी ढगाळ वातावरणामुळे गायब झाली. सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची जोरदार लाट आली आहे. त्याचाच परिणाम बेळगावमध्येही झाल्याचे दिसून येत आहे.
या थंडीमुळे उबदार कपडे परिधान करण्याची वेळ आली आहे. डोक्याला कानटोपी, हाताला मोजे आणि अंगामध्ये स्वेटर घालावे लागत आहे. एरव्ही झोपताना एखादा चादर किंवा शाल घेणाऱ्यांना आता उबदार रग आणि वाकळ घेण्याची वेळ आली आहे. थंडीमुळे स्वेटर विक्रेत्यांकडेदेखील ग्राहकांचा ओढा वाढला आहे. एकूणच थंडीमुळे साऱ्यांनाच हुडहुडी भरली आहे.
शेकोट्यांचा आधार
या थंडीचा आरोग्यावरदेखील परिणाम होताना दिसत आहे. खोकला, सर्दी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्येही गर्दी होताना दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे चौकाचौकामध्ये तसेच शेतामध्ये शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या थंडीमुळे रात्री 9 नंतर घराबाहेर न पडणेच अनेकजण पसंत करत आहेत.









