रात्रीच्या वेळी आरडाओरड केल्याचा जाब विचारत चाकू हल्ला : तिघा जणांविरुद्ध एफआयआर
बेळगाव : क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून एका तरुणाचा भीषण खून करण्यात आला आहे. रविवारी सकाळी हुदली, ता. बेळगाव येथे ही घटना घडली असून मारिहाळ पोलीस स्थानकात त्याच गावातील तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुत्ताण्णा दुर्गाप्पा गुडबली (वय 22) राहणार हुदली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवार दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुत्तण्णा चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून खासगी इस्पितळात हलविण्यात आले. दुपारी त्याचा मृत्यू झाला. खून झालेल्या मुत्ताण्णाचे वडील दुर्गाप्पा लगमप्पा गुडबली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश सदानंद नारी, विशाल सदानंद नारी, सिद्धाप्पा मोकप्पा मुत्त्याण्णावर, तिघेही राहणार हुदली यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक पुढील तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार मुत्तण्णा हा एका खासगी कारखान्यात काम करीत होता. मित्राच्या वाढदिवसासाठी शनिवारी रात्री तो आपल्या मित्रांसमवेत गेला होता. वाढदिवस झाल्यानंतर आपल्या मोटारसायकलवरून तो घरी परतत होता. त्यावेळी कोणीतरी जोरात ओरडले. मुत्ताण्णानेच ओरडल्याच्या संशयाने शनिवारी रात्री त्याला मारहाण करण्यात आली होती. रविवारी सकाळी जनता प्लॉट हुदली येथील रायण्णा फलकाजवळ मुत्तण्णा बसलेला असताना मोटारसायकलवरून आलेल्या संशयित आरोपींनी मुत्तण्णाबरोबर भांडण काढून शनिवारी रात्री गल्लीत आरडाओरड का केलास? अशी विचारणा करीत पुन्हा त्याच्याबरोबर भांडण काढले. त्यानंतर चाकू हल्ला करण्यात आला. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुत्ताण्णाचा मृत्यू झाला. सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून खून प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.









