प्रतिनिधी / बेळगाव
उन्हाळी सुटीला सुरुवात झाली असून हुबळी-मुंबई एक्स्प्रेसला मोठी गर्दी होत आहे. बेळगावहून मुंबईला जाण्यासाठी ही हक्काची रेल्वे असून सध्या मात्र बुकिंग मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रेल्वेला आणखी स्लीपर कोच डबे जोडावेत, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
हुबळी, बेळगाव, मिरज या भागातील हजारो नागरिक व्यवसाय, नोकरी, शिक्षणसाठी मुंबईत स्थायिक आहेत. त्याचबरोबर बेळगाव हे एक औद्योगिक शहर असल्यामुळे मुंबई येथील कार्पोरेट कंपन्यांचे ये-जा असते. हुबळी-मुंबई एक्स्प्रेस रात्रीच्यावेळी धावत असल्याने प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. सायंकाळी 6 वाजता बेळगावमधून निघणारी एक्स्प्रेस सकाळी 8 च्या सुमारास मुंबईला पोहोचते. यामुळे रात्रीचा प्रवास करून दिवसा कामाच्या ठिकाणी पोहोचणे सोयीचे ठरते.
बेळगावमधून मुंबईला जाण्यासाठी हुबळी व चालुक्य एक्स्प्रेस अशा दोन रेल्वे उपलब्ध असल्या तरी चालुक्य एक्स्प्रेस ही लांब पल्यावरून धावत असल्यामुळे बेळगावमध्ये तितकेसे बुकिंग मिळत नाही. त्यामुळे हुबळी-दादर एक्स्प्रेसला गर्दी होते. सर्वसामान्यांना परवडणारे स्लीपर कोच अपुरे पडत असून या एक्स्प्रेसला किमान दोन स्लीपर कोच जोडावेत, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.









