शेतकऱ्यांचे निवेदन : अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव : हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकल धरणातून पाणी देण्याचा पाटबंधारे खात्याने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज्य रयत संघ-हरित सेनेने केली आहे. पदाधिकाऱ्यांनी गुरुवार दि. 16 रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन राज्य सरकारच्या नावे दिले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकल धरणातून पाणी देण्यात आल्यास बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याचा तुटवडा भासणार आहे. उन्हाळा जवळ आला असून शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे. तसेच आता हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकलमधून पाणी देण्याचा निर्णय झाल्यास अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. शेतीला वेळीच पाणी न मिळाल्यास पिकांचे नुकसान होणार आहे. हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यास अनेक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. सरकारने त्वरित निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा राज्य रयत संघ-हरित सेना बेळगाव शाखेने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संजू हावण्णावर, किसन नंदी, जगदीश देवरड्डी आदी उपस्थित होते.









