खानापूर : हुबळी-दादर एक्स्प्रेस रेल्वेला खानापूर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. याला यश आले असून खानापूर रेल्वे स्थानकावर हुबळी-दादर एक्सप्रेसला थांबा देण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाचे सहसंचालक विवेक कुमार सिन्हा यांनी हुबळी विभागीय कार्यायाला दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात खानापूर रेल्वेस्थानकावर हुबळी-दादर एक्स्प्रेस थांबणार आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. हुबळी-दादर एक्स्प्रेस क्र.. 17317/17318 या मुंबईला जाणाऱ्या रेल्वे एक्स्प्रेसला खानापूर रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, यासाठी गेल्या वर्षभरापासून खासदार विश्वेश्वर हेगडे हे सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होते.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुश गोयल यांची भेट घेऊन खानापूर रेल्वेस्थानकावर लांबपल्ल्याच्या रेल्वेना थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. यात हुबळी-दादर या मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर हुबळी-दादर एक्स्प्रेसला खानापूर येथे थांबा देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या पत्रात केंव्हापासून रेल्वे थांबवण्यात येणार याबाबत तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात या रेल्वेला खानापूर येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात येणार आहे. खानापूर येथून तिकीटविक्रीच्या माध्यमातून जर महसूल चांगला मिळाल्यास या रेल्वेचा थांबा कायम करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.









