‘आयएसएस’मध्ये माघारीची लगबग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जवळपास 18 दिवस अंतराळात वैज्ञानिक प्रयोग केल्यानंतर आता भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्याच्या इतर तीन सहकारी अंतराळवीरांना निरोपाची लगबग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) सुरू झाली आहे. अॅक्सिओम-4 मिशनची टीम सोमवारी पृथ्वीवरील परतीच्या प्रवासावर निघणार आहे. ही टीम आज, सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:35 वाजता ‘आयएसएस’वरून रवाना होऊन मंगळवार, 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास समुद्रात उतरणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी अंतराळ स्थानकात आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात शुभांशू शुक्लाने ‘सारे जहाँ से अच्छा’ असा नारा दिला.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्या दोन दिवसांपासून माघारीची लगबग सुरू झाली होती. रविवारी सायंकाळी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:25 वाजता निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. हा समारंभ थेट प्रक्षेपित करण्यात आला, जो जगभरातील लाखो लोकांनी पाहिला. त्यापूर्वी ‘अॅक्सिओम-4’मधील सहकाऱ्यांना निरोप देण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी सर्व अंतराळवीरांनी एकत्रित एक खास डिनर समारंभ आयोजित केला होता. सध्या अवकाशात 11 अंतराळवीर आहेत. यामध्ये ‘एक्सपिडिशन-73 मिशनमधील सात आणि अॅक्सिओम-4 मिशनमधील 4 अंतराळवीरांचा समावेश आहे.
अमेरिकन अंतराळवीर जॉनी किम यांनी ‘एक्स’वर डिनर पार्टीची छायाचित्रे व्हायरल केली आहेत. यामध्ये त्यांनी ‘अॅक्सिओम-4’ क्रूसोबत त्यांनी घेतलेले जेवण सर्वात संस्मरणीय असल्याचे म्हटले आहे. या डिनरमध्ये रिहायड्रेटेड कोळंबी कॉकटेल आणि क्रॅकर्स स्टार्टर म्हणून देण्यात आले होते. तर, चिकन आणि बीफ फजिता ‘मेन कोर्स’ म्हणून आणि अखेरीस ब्रेड, कंडेन्स्ड मिल्क व अक्रोडच्या केकचाही समावेश होता.
शुभांशू शुक्लासह चार क्रू सदस्य अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) गेल असून त्यांना आता तीन आठवडे झाले आहेत. त्यांची ही मोहीम 14 दिवसांची होती. त्यानुसार 10 जुलैपर्यंत परतण्याची अपेक्षा होती. मात्र, शुभांशू शुक्ला आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांचा मुक्काम खराब हवामानामुळे वाढला आहे. अॅक्सिओम-4 मोहीम 25 जून रोजी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून लॉन्च करण्यात आली होती. ड्रॅगन अंतराळयान 28 तासांच्या प्रवासानंतर 26 जून रोजी ‘आयएसएस’वर दाखल झाले होते. त्यानंतर सातत्याने त्यांच्याविषयीचे अपडेट्स मिळत आहेत. यापूर्वी 6 जुलै रोजी आयएसएस स्थानकावरून शुभांशूचे काही फोटो समोर आले होते. ज्यामध्ये शुभांशू क्युपोला मॉड्यूलच्या खिडकीतून पृथ्वीकडे पाहताना दिसला होता. क्युपोला मॉड्यूल ही घुमटाच्या आकाराची निरीक्षण खिडकी असून यामध्ये 7 खिडक्या आहेत









