पावसाने भारताचे विजय हुकला, मोहम्मद सिराज सामनावीर
वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने यजमान विंडीविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. भारताला या मालिकेत विंडीजचा व्हाईटवॉश करण्याची संधी मात्र पावसामुळे हुकली. दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातील पाचव्या दिवशीचा संपूर्ण खेळ पावसाने वाया गेल्याने हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला.

विंडीज संघाला भारताकडून निर्णायक विजयासाठी 365 धावांचे आव्हान मिळाले होते. या कसोटीतील खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर विंडीजने दुसऱ्या डावात 2 बाद 76 धावा जमवल्या होत्या. रविचंद्रन अश्विनने विंडीजचे दोन फलंदाज बाद केले होते. दरम्यान सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मैदान आणि खेळपट्टी पूर्णपणे ओलसर झाली होती. सोमवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला सुरुवात करण्यासाठी पंचांनी मैदान आणि खेळपट्टीची पाहणी केली पण उपाहारापर्यंत खेळ होऊ शकणार नाही असे घोषित केले. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती पण मैदान खेळ सुरू करण्यास योग्य नसल्याचे आढळून आले. उपाहारानंतर खेळपट्टीवरील आच्छादन काढण्यात आले आणि पंचांनी सामना सुरू होईल असे सांगितले. दरम्यान पुन्हा पावसाचे ढग काही मिनिटातच जमा झाले व पावसाने हजेरी लावली. पंचांनी यानंतर पुन्हा खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी करून शेवटच्या दिवशीचा खेळ होऊ शकणार नाही, असे घोषित केल्याने ही दुसरी कसोटी अखेर अनिर्णित अवस्थेत समाप्त झाली.
आयसीसीच्या 2023-25 च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत ही कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेत भारताला पूर्ण 24 गुण मिळवण्याची संधी निर्माण झाली होती पण पावसाने ती हुकवली. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या नियमानुसार प्रत्येक सामन्यातील विजय मिळवणाऱ्या संघाला एकूण 12 गुण दिले जातात. या नियमानुसार आता विंडीजला हा सामना अनिर्णित राखल्याने 4 गुण मिळणार आहेत तर भारताने या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून 12 गुण घेतले आहेत. विंडीजविरुद्ध भारतीय संघाने सलग पाचवी कसोटी मालिका जिंकली आहे. आता विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत भारतीय संघ आगामी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. तसेच भारताची इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका भारतात होणार आहे. भारताने विंडीजविरुद्धच्या मालिकेत एकूण 16 गुण मिळवले आहेत.
संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव सर्वबाद 438, विंडीज प. डाव सर्वबाद 255, भारत दु. डाव 2 बाद 181 डाव घोषित, विंडीज दु. डाव 2 बाद 76.









