वृत्तसंस्था/ कौलालंपूर
भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अव्वल बिलियर्डपटू पंकज अडवाणीने शनिवारी येथे झालेल्या विश्व बिलियर्डस् स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना आपल्याच देशाच्या सौरव कोठारीचा 4-0 अशा प्रेम्समध्ये पराभव केला. पंकज अडवाणीच्या वैयक्तिक बिलियर्डस् कारकीर्दीतील हे 25 वे विश्वविजेतेपद आहे.
पंकज अडवाणी आणि कोठारी यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या गेममध्ये 149 गुणांचा ब्रेक नोंदविला. अडवाणीने अद्याप आयबीएसएफ विश्व बिलियर्ड स्पर्धेचे जेतेपद मिळविलेले नाही.
अडवाणी आणि कोठारी यांच्यात हा अंतिम सामना सात प्रेम्समध्ये खेळविण्यात आला. पहिल्या प्रेमपासूनच अडवाणीने जेतेपदाकडे वाटचाल सुरू केली. या लढतीतील दुसऱया प्रेममध्ये अडवाणीने 77 गुणांचा ब्रेक नोंदवित कोठारीवर 2-0 अशी आघाडी मिळविली. तिसऱया पेममध्ये अडवाणीने 153 गुणांचा सर्वोच्च ब्रेक नोंदविला. चौथ्या प्रेममध्ये अडवाणीने 86 गुणांचा तसेच 60 गुणांचा ब्रेक नोंदवून कोठारीचे आव्हान संपुष्टात आणले. कोठारीने या संपूर्णसामन्यात 72 गुण नोंदविले. तर अडवाणीने 600 पेक्षा अधिक गुणांची नोंद केली. पंकज अडवाणीने ही स्पर्धा सलग पाचव्या वर्षी जिंकली आहे. यापूर्वी सदर स्पर्धा 2019 साली भरविण्यात आली होती. त्यानंतर कोरोना समस्येमुळे तीन वर्षे ही स्पर्धा घेण्यात आली नव्हती. पंकज अडवाणीने कतारमध्ये यापूर्वीचे आपले शेवटचे म्हणजे 24 वे विश्वविजेतेपद मिळविले होते. कतारमध्ये त्याने आयबीएसएफ 6-रेड स्नूकर विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.









