ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने घेतली असून, या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद आता पुण्यात उमटले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानकात कर्नाटकच्या चार बसेसला काळे फासले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
बेळगाव जवळील हिरेबागवाडी येथे आज सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवले. दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. या घटनेवर बेळगावातील मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून या घटनेचा निषेध नोंदवला. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यात शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे. स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कर्नाटकच्या चार बसेसला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.
अधिक वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. स्वारगेट बस स्थानक परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.